विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्यास ‘राजीव गांधी विद्यार्थी सुरक्षा योजने’ अंतर्गत नुकसान भरपाई मिळणार

राज्य सरकारची नवीन योजना

मुंबई : एखाद्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्यास किंवा जखमी झाल्यास त्याला आता आर्थिक संरक्षण मिळणार आहे. इयत्ता पहिली ते बारावीपर्यंत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्यास ‘राजीव गांधी विद्यार्थी सुरक्षा योजने’ अंतर्गत विद्यार्थ्याच्या कुटुंबीयांना दीड लाख रुपये नुकसान भरपाई मिळणार आहे. विद्यार्थ्यांसाठी ही नवी योजना राज्य सरकारने आणली आहे.

याआधी विमा योजनेअंतर्गत राज्य सरकार या विद्यार्थ्यांना मदत करायचं. राज्यातील बारावीपर्यंतचा विद्यार्थी किंवा विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू झाल्यास किंवा जखमी झाल्यास ‘राजीव गांधी विद्यार्थी सुरक्षा योजने’ अंतर्गत विमा कंपन्यांमार्फत सानुग्रह अनुदान दिलं जातं. त्यासाठी सर्व विद्यार्थ्यांच्या विम्याचे हप्ते राज्य सरकारकडून भरले जात होते. 

परंतू, विमा कंपन्या विविध कारणे सांगून विद्यार्थ्यांना भरपाई देण्याबाबत टाळाटाळ करत होत्या. त्यामुळे या विद्यार्थ्यांना मदत मिळण्यास विलंब होत होता. त्यामुळे विमा कंपन्यांमार्फतची योजना बंद करून त्याऐवजी सानुग्रह अनुदान देण्याची योजना सुरु करण्यात आली. या योजनेत सुधारणा करण्याचा निर्णय राज्याच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने घेतला आहे.