‘मविआ’ सरकार धोक्यात : शिंदेंच्या गटात 40 आमदार, मुख्यमंत्र्यांनी वर्षा सोडले

मुंबई : महाराष्ट्रात गेल्या दोन दिवसांपासून घडत असलेल्या नाट्यमय घडामोडींमुळे राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. शिवसेनेचे नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे महाविकास आघाडी सरकार धोक्यात आले आहे. याच पार्श्वभूमीवर काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फुटलेल्या शिवसेना आमदारांना भावनिक साद घातली. यानंतर शिवसेनेचे पुन्हा दोन आमदार फुटल्याचं समोर आलं आहे. 

शिवसेनेचे माहिम, दादर मतदार संघाचे आमदार सदा सरवणकर आणि कुर्ल्याचे आमदार मंगेश कुडाळकर यांनी बुधवारी रात्री मुंबई सोडून गुवाहाटीत जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांच्याकडे आता आमदारांचे संख्याबळ वाढलं आहे.

मुख्यमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेनंतर आमदार सदा सरवणकर आणि मंगल कुडाळकर यांचे फोन नॉट रिचेबल लागत आहेत. याचदरम्यान मुख्यमंत्र्यांनी शासकीय निवासस्थान वर्षा सोडल्याने शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. या दोन आमदारांनंतर एकनाथ शिंदेंच्या गोटातील आमदारांची संख्या आता 40 च्या वर पोहोचली आहे. दरम्यान या दोन्ही आमदारांनी काल बंडखोर आमदारांवर टीका केली होती.

शिवसेनेचे 55 आमदार असून यातील दोन तृतीआंश पेक्षा अधिक आमदार म्हणजे 37 पेक्षा अधिक आमदार शिवसेना नेते एकनाथ शिंदेंसोबत आहेत, त्यामुळे शिदेंच्या गटाला अधिकृत मान्यता देण्याबाबत विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना निर्णय घ्यावा लागेल.

शिवसेनेचे एकनाथ शिंदे यांनी विधानपरिषदेचा निकाल लागताच शिवसेना आमदारांना घेऊन पक्षाविरोधात बंड पुकारला आहे. यानंतर राज्यात राजकीय नाट्याला सुरुवात झाली. शिवसेनेचे तब्बल 30 ते 35 आमदार रातोरात गुजरातच्या सुरतमधील एका हॉटेलमध्ये पोहचले. यानंतर सुरतमार्गे गुवाहाटीला रवाना झाले. ‘मविआ’ सरकार सोडून भाजपासोबत सरकार स्थापन करा, अशी मागणी शिंदेंनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

दरम्यान शिंदेंच्या गटात आता 40 पेक्षा जास्त आमदार झाले असून लवकरचं राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे राज्यातील राजकारणात नेमके काय बदल होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.