भावाने काम देण्यास दिला नकार, तरीही अमरीश पुरी बनले बॉलिवूडचे नायकापासून महान खलनायक

टीम AM : भारतीय चित्रपटसृष्टीतील महान खलनायकांपैकी एक, अमरीश पुरी यांचा आज 22 जून रोजी जन्मदिन आहे. 1932 साली जन्मलेल्या अमरीश पुरी यांनी ‘मिस्टर इंडिया’, ‘कुर्बानी’, ‘नसीब’, ‘हीरो’, ‘कोयला’, ‘करण अर्जुन’ आणि ‘सल्तनत’ यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये खलनायकाची भूमिका अजरामर केली. 1971 मध्ये वयाच्या 40 व्या वर्षी अमरीश पुरी यांनी सुनील दत्तच्या रेश्मा और शेरा या चित्रपटातून पदार्पण केले. 30 वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी 400 हून अधिक चित्रपट केले.

अमरीश पुरी सुरुवातीला विमा एजंट म्हणून काम करायचे. अमरीश पुरी हे मदन पुरी यांचे भाऊ असून त्यांनी 430 चित्रपटांमध्ये काम केले होते. अमरीश पुरी यांनी भावाकडे चित्रपटात काम मागितले असता, त्यांचा चेहरा हिरोसारखा नाही, असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले. यानंतर अमरीश पुरी यांनी आपल्या करिअरची सुरुवात रंगभूमीपासून केली. अमरीश पुरी यांनी साल 1967 मध्ये ‘शांतता कोर्ट चालू आहे’ या मराठी नाटकातून पदार्पण केले. अमरीश पुरी यांनी यात अंध व्यक्तीची भूमिका साकारली होती.

‘मिस्टर इंडिया’ हा चित्रपट अमरीश पुरीच्या कारकिर्दीतील मैलाचा दगड ठरला. या चित्रपटात त्यांनी मौगॅम्बोची भूमिका साकारली होती. ‘मौगॅम्बो खुश हुआ’ या चित्रपटातील त्यांचा संवाद आजही स्मरणात आहे. मात्र, अमरीश पुरी ‘मिस्टर इंडिया’ साठी पहिली पसंती नव्हती. चित्रपटाचे दिग्दर्शक शेखर कपूर यांना प्रथम अनुपम खेर यांना या भूमिकेसाठी कास्ट करायचे होते. मात्र, चित्रपटाचे निर्माते बोनी कपूर यांना अमरीश पुरी यांना कास्ट करायचे होते. अमरीश पुरी आणि बोनी कपूर यांनी 1980 मध्ये आलेल्या ‘हम पांच’ चित्रपटात एकत्र काम केले होते.

अमरीश पुरी हे बॉलिवूडमधील सर्वाधिक मानधन घेणारे खलनायक होते. अमरीश पुरी यांनी बॉलिवूडशिवाय हॉलिवूडमध्येही खलनायकाच्या भूमिकेतून आपली छाप सोडली आहे. दिवंगत अभिनेत्याने स्टीव्हन स्पीलबर्गच्या ‘इंडियाना जोंस’ मध्ये मुला रामची भूमिका केली होती. अमरीश पुरी यांचे 2005 मध्ये ब्रेन हॅमरेजमुळे निधन झाले. अमरीश पुरी यांचा शेवटचा चित्रपट ‘किस्ना : द वॉरियर पोएट’ होता, त्यांना भावपूर्ण आदरांजली.