विकासकामाची प्रलंबित देयके अदा करण्यासाठी 30 हजारांची मागितली होती लाच
अंबाजोगाई : महाराष्ट्रात राजकीय वातावरण तापलं असतानाच अंबाजोगाईतही एक खळबळजनक घटना घडली आहे. विकासकामाची प्रलंबित देयके अदा करण्यासाठी 30 हजार रुपयांची लाच मागणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या बीड शाखेच्या पथकाने रंगेहाथ पकडले आहे.
शहरातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयातचं ही कारवाई आज दिनांक 22 जूनला दुपारी 1 वाजताच्या सुमारास करण्यात आली. संजयकुमार कोकणे असे लाच घेताना पकडलेल्या कार्यकारी अभियंत्यांचे नाव आहे.
अंबाजोगाई शहरात कार्यकारी अभियंता म्हणून रुजू झाल्यानंतर संजयकुमार कोकणे चांगलेच चर्चेत आले होते. कंत्राटदारांची अडवणूक करणं, अरेरावीची भाषा वापरणं यासह पिस्तूल प्रकरणी त्यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे थेट तक्रार केली होती.
जिल्हा नियोजन समितीतंर्गत निधीतून केलेल्या कामांची प्रलंबित देयके अदा करण्यासाठी 30 हजार रुपयांची लाच त्यांनी भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष भगवान केदार यांच्याकडे मागितली होती. याबाबत केदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. तक्रारीच्या अनुषंगाने लाच स्वीकारताना कार्यकारी अभियंता संजयकुमार कोकणे यांना रंगेहाथ पकडले आहे. दरम्यान कोकणे यांना ताब्यात घेतले असून शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे, अशी माहिती सुत्रांकडून मिळाली आहे.