‘मविआ’ सरकार अल्पमतात : उध्दव ठाकरेंनी राजीनामा द्यावा

रामदास आठवलेंनी केले ट्विट

मुंबई : मंत्री एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीला जबरदस्त दणका दिला आहे. महाविकास आघाडीचे सरकार अल्पमतात आल्यामुळे आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा. त्यांना सत्तेवर राहण्याचा अधिकार राहिलेला नाही, असं रामदास आठवले यांनी ट्विट करत आणि फेसबुकवर म्हणटले आहे.

एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीला दिलेल्या दणक्यात भाजपचा कोणताही हात नाही. शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सोबत युती केल्यामुळे शिवसेनेचे आणि दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना मानणारे आमदार नाराज होते. एकनाथ शिंदे आणि अनेक आमदार काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस सोबत शिवसेनेने केलेल्या युतीवर नाराज होते.

भाजप सोबत शिवसेनेने युती करावी, अशी एकनाथ शिंदें आणि अनेक शिवसेना आमदारांची इच्छा होती. मात्र, संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस सोबत युतीचा चुकीचा निर्णय घेतला. त्यातून एकनाथ शिंदे आणि अन्य शिवसेना आमदारांची नाराजी वाढत गेली. त्यामुळेच एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीला दणका दिला असून महाविकास आघाडीचे सरकार लवकर कोसळणार आहे. एकनाथ शिंदे यांच्या सोबत शिवसेनेचे बहुसंख्य आमदार असून महाविकास आघाडीचे सरकार अल्पमतात गेले असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा.