मंत्री बाळासाहेब थोरात यांचा राजीनामा
मुंबई : महाराष्ट्रात सकाळपासूनचं राजकीय वातावरण तापलं असून एकनाथ शिंदे यांच्या बंडाने वातावरण ढवळून निघाले आहे. राज्यात राजकीय अस्थीरता येईल का ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. शिवसेनेनंतर काँग्रेसमध्येही राजकीय घडामोडी घडत आहेत. विधान परिषदेच्या निकालानंतर काँग्रेसमध्ये धुसफूस पाहायला मिळाली. विधान परिषदेच्या निकालानंतर मंत्री बाळासाहेब थोरात यांनी विधिमंडळ गटनेते पदाचा राजीनामा दिला आहे.
एकीकडे राज्यात विधान परिषदेच्या निवडणुकीच्या निकालानंतर भाजपचे पाचही उमेदवार विजयी झाले तर, दुसरीकडे महाविकास आघाडीला मोठे हादरे बसले आहेत. राज्यातील विधान परिषदेच्या 10 जागांसाठी सोमवारी निवडणुक पार पडली. यामध्ये काँग्रेसच्या एक उमेदवाराला पराभवाला सामोरं जावं लागलं.
काँग्रेसच्या पहिल्या पसंतीचे उमेदवार चंद्रकांत हंडोरे यांचा पराभव झाला. त्यांच्या पराभवानंतर काँग्रेसमध्ये नाराजीचा सुर दिसून आला. काँग्रेसला 44 मतांपैकी 41 मतं मिळालीत. म्हणजेच काँग्रेसची तीन मते फुटली आहेत.
दरम्यान, आमच्या पक्षाची मते फुटली, इतरांना काय दोष द्यायचा, असं वक्तव्य थोरात यांनी केलं होतं. अडीच वर्ष सत्तेत राहून आमदारांमध्ये नाराजी असेल तर नेमकं कुठं आणि का चुकतंय, याचा विचार करण्याची गरज असल्याचं थोरात यांनी स्पष्ट केलंय.