शब्द हे शस्त्र असल्याने पत्रकारितेत ताकद – युवा व्याख्याते गणेश शिंदे
आदर्शवत व्यक्तींचा सन्मान प्रेरणादायी – आयपीएस पंकज कुमावत
वार्ता समूहाचा पुरस्कार वितरण, वर्धापन दिन सोहळा दिमाखात साजरा
अंबाजोगाई : गेल्या चौदा वर्षांपासून अखंडिपणे प्रकाशित होणार्या दैनिक वार्ता समूहाचा चौदावा वर्धापन दिन सोहळा व पुरस्कार वितरण सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या दिमाखात व उत्साहात पार पडला. या सोहळ्याला भावनिक व आत्मियतेची किनार होती. कारण, हा सोहळा अंबाजोगाई शहरातील कर्तृत्व संपन्न व्यक्तींचा गौरव सोहळा होता. मान्यवरांच्या हजेरीने आणि मनोगताने सभागृहाचे वातावरण पूर्णतः बदलले होते.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी अंबाजोगाई पिपल्स बँकेचे चेअरमन राजकिशोर मोदी हे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून केज व अंबाजोगाईचे अति. पोलिस अधिक्षक पंकज कुमावत, विशेष आकर्षण म्हणून आयबीएन लोकमत या वृत्तवाहिनीचे वृत्तनिवेदक मिलिंद भागवत, युवा व्याख्याते गणेश शिंदे यांची उपस्थिती होती. तर यावेळी बालरोगतज्ञ डॉ. श्रीनिवास रेड्डी, डॉ. नितीन चाटे, प्रसिद्ध उद्योजक प्रताप पवार, दत्तात्रय अंबेकर यांच्यासह नगरभूषण पुरस्कार प्राप्त शेख मुख्तार, सद्भावना पुरस्कार प्राप्त डॉ. संतोष देशपांडे, युवा गौरव पुरस्कार प्राप्त रूपेशकुमार चव्हाण आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. यावेळी बोलताना अति. पोलिस अधिक्षक पंकज कुमावत म्हणाले की, वार्ता समूहाने समाजातील वेगवेगळ्या घटकांमध्ये काम करणार्या व्यक्तींचा सन्मान करून त्यांचे काम इतरांना प्रेरणादायी ठरेल, अशा कार्यक्रमांच्या माध्यमातून समाज सुद्धा प्रेरणा घेत असतो. आम्ही पोलिस खात्याचा माध्यमातून गुन्हेगारी कमी व्हावी, यासाठी प्रयत्नशील असतो. समाजाने सुद्धा यात दक्ष राहण्याची गरज आहे. आपल्या आजूबाजूला किंवा इतर ठिकाणी काही चुकीची घटना घडत असेल तर पोलिसांना याची खबर दिली तर यातून मोठा गुन्हा रोखला जावू शकतो, सामाजिक स्तरावर चांगल्या संस्काराची गरज आहे आणि चांगल्या संस्कारातूनच चांगल्या समाजनिर्मितीची अपेक्षा आहे, सत्कार्य करण्यासाठी प्रेरणा मिळावी, अशा व्यक्तींमत्वाचा सन्मान करण्यात आला आहे. अशा माणसांच्या सानिध्यात आपण या भागामध्ये उत्तम लोकसेवा देण्याचा प्रयत्न करत आहे. येत्या काळात पोलिसांचा आणखी धाक निर्माण व्हावा, कायदा व सुव्यवस्था प्रस्थापित व्हावी याकरिता नागरिकांची मदत मोलाची ठरत आहे. येणार्या काळातही नागरिकांनी सतर्कता दाखवावी, असे आवाहन अति. पोलिस अधिक्षक पंकज कुमावत यांनी केले आहे.
यावेळी आयबीएन लोकमत या वृत्तवाहिनीचे वृत्तनिवेदक मिलिंद भागवत बोलताना म्हणाले, समाज माध्यमांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या वृत्त वाहिन्या, यु – ट्यूब चॅनल, ट्युटर, फेसबुक, व्हाट्सॲप आणि वृत्तपत्रांच्या कार्यपध्दतीमध्ये सातत्याने बदल होत आहेत. मराठवाड्यात आठशे पन्नासच्या वर यु – ट्यूब चॅनल कार्यरत आहेत. तर देशात जवळपास दोनशे वृत्तवाहिन्यांचे चॅनल्स सध्या कार्यरत आहेत. आपल्या शहरात, शहराबाहेर, जिल्ह्यात, राज्यात आणि जगात घडलेल्या घटनेचे वृत्त लगेच मोबाईलवर आपल्याला कळु लागले आहे. अलिकडे व्हाट्सॲप पत्रकारिता अस्तित्वात आली आहे. त्यामुळे प्रत्येक जण एक प्रकारे पत्रकार झाला आहे. आगामी काळात फाईव्ह जी मोबाईल येत आहेत. या तंत्रज्ञानामुळे इलेक्ट्रॉनिक मीडियात मोठे बदल होणार आहेत. त्यामुळे या क्षेत्रातील आव्हाने वाढणार आहेत. लोकांना हवे ते ताबडतोब देण्यासाठी आता पत्रकारांना तत्पर रहावे लागणार आहे. वृत्त वाहिन्यांवर काम करणाऱ्या पत्रकारांसोबतच वृत्तपत्र माध्यमांत काम करणार्या पत्रकारांनाही ही तप्तरता अंगी निर्माण करावी लागणार आहे. या सर्व बदलांचा परिणाम वृत्तपत्रांवर होईल, अशी चर्चा होत असली तरी जी वृत्तपत्रे नवे तंत्रज्ञान विकसित करुन निर्भिडपणे उभी राहतील, त्या वृत्तपत्रांना कसलाही धोका होणार नाही, असे त्यांनी सांगितले. ग्रामीण आणि शहरी भागात पत्रकारिता करणार्या पत्रकारांचे आपल्या कुटुंबाकडे दुर्लक्ष होते. त्यामुळे या क्षेत्रात काम करणे कठीण असून असे प्रामाणिकपणे काम करणार्या कुटुंबियांचे कौतुकच करावे तेवढे कमीच आहे, असे सांगून या कार्यक्रमातील सत्कारमूर्तींकडून त्यांचे कार्य पाहुन मला प्रेरणा मिळाली. कळत – नकळत आपल्या मातीतील भूमीपुत्रांचा गौरव राहून जातो. परंतू, आपल्याच माणसाकडून होणारा सत्कार ही अनुभूती विशेष असते, असे मत आयबीएन लोकमतचे वृत्तनिवेदक मिलिंद भागवत यांनी व्यक्त केले.
यावेळी युवा व्याख्याते गणेश शिंदे म्हणाले की, स्वातंत्र्यपूर्व काळापासून वृत्तपत्रांना अनन्यसाधारण महत्व आहे. त्या काळापासून वृत्तपत्रांची मुस्कटदाबी तत्कालीन सरकारांकडून होत आलेली आहे. अशा परिस्थितीत सरकारचं डोके ठिकाणावर आहे का ? असा सवाल लोकमान्य टिळकांनी विचारला होता. त्यामुळे वृत्तपत्रांना आजही महत्व आहे. शब्द हे शस्त्र आहे. त्यामुळेच पत्रकारितेमध्ये ताकद आहे. तुम मुझे खून दो, मैं तुम्हे आझादी दुंगा, गरिबी हटाव असे नारे दिले, त्यावेळी व्यवस्थेत अमुलाग्र बदल झालेला आहे. अच्छे दिन या दोन शब्दांनी सरकार आणले, इतकी ताकद शब्दांत आहे. पत्रकाराला समाजातील योग्य व्यक्तींची पारख असते. अशाच सत्कार्य करणार्या व्यक्तींच्या पाठीवर कौतुकाची थाप द्यायला मागेपुढे पाहू नका. समाजाने संवेदनशीलता जागृत ठेवणे गरजेचे आहे. देण्यासाठी कुवत लागत नाही. तर दानत हवी, त्यामुळे मनमोकळेपणाने कौतुक तरी करा. आपण हल्ली मोबाईलवर व्यस्त असतो, आपल्याकडे आप्तेष्ठ, नातलगांचे कौतुक करायला सुद्धा वेळ नाही, हे वेळीच बदलायला हवे. आता तरी पालकांच्या प्रेमाची किंमत करायला शिका. पितृदिनी तरी बापाला बोलून बघा. भाबड्या बापाला वेळीच समजून घ्या. मनसोक्तपणे कौतुक करायला शिका. जे आहे, त्याचा आनंद बाळगा, नाही त्याच्या दुःखात झिजून जाऊ लागलो आहोत. आपल्यातील वेगळेपण ओळखायला शिका. ते वेगळेपण कळले की, त्यात मनस्वी जीवन जगता येते आणि हाच समाधानी जीवनाचा पाया आहे, असा कानमंत्र युवा व्याखाते गणेश शिंदे यांनी दिला. पुढे ते म्हणाले, आयुष्याचा संघर्ष जवळून बघण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी संभाजीराजांना आग्रा येथील दरबारात सोबत नेले होते. तिथेच संघर्ष करायचे विचार, स्वाभिमानाची शिकवण, अपमान सहन न करण्याचे धडे छत्रपती संभाजीराजांना मिळाले. असेच संस्कार आजघडीला पाल्यांवर देण्यासाठी पालकांनी प्रयत्न करायला हवेत, असे विचार गणेश शिंदे यांनी व्यक्त केले.
अध्यक्षीय समारोप करताना अंबाजोगाई पिपल्स बँकेचे चेअरमन राजकिशोर मोदी म्हणाले की, वार्ता समूहाने या मातीतील माणसांचा गौरव व सन्मान केलेला आहे. या शहरातील गुणवंत व प्रज्ञावंत आणि यशवंत लोकांचा सन्मान करून त्यांच्या कामाची पावती पुरस्काराच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. वार्ता समूहाने सातत्याने या भागातील जनसामान्यांचे प्रश्न ऐरणीवर आणून ते प्रश्न प्राधान्याने सोडविण्याचा प्रयत्न केेलेला आहे. वृत्तपत्राच्या माध्यमातून बांधिलकी जपण्याचा प्रयत्न वार्ता समूह करीत आहे. सामाजिक जाण असलेले हे वृत्तपत्र अंबाजोगाई शहरांसह बीड जिल्ह्यात आपल्या लेखणीची छाप पाडत आहे. त्यामुळे अशा उपक्रमाची दखल समाजसुद्धा घेत असतो. कार्यक्रमाचे प्रास्ताविक वार्ता समूहाचे संपादक परमेश्वर गित्ते यांनी केले.
या कार्यक्रमात अंबाजोगाई शहरातील गेल्या वर्षभरात विविध क्षेत्रात यशस्वी ठरलेल्या गुणवंतांचा सन्मान करण्यात आला. ज्यामध्ये स्त्री रोगतज्ञ डॉ. मनिषा फड, मुकुंदराज महाविद्यालयाचे प्राचार्य शाहूराव गुळभिले, स्त्रीरोग रूग्णालयाच्या अधिक्षका डॉ. अरूणा केंद्रे, सामाजिक कार्यकर्ते पियुष शिंदे, सामजिक कार्यकर्ते हकीमलाला पठाण, सामाजिक कार्यकर्ते विनोद पोखरकर, अशोकराव केदार, अधिपरिचारक सय्यद नजीर सय्यद वजीर, वैष्णवी शिंदेे, ऋषिकेश मुंदडा, छत्रपती शिवाजी महाराज पुरूष बचतगट, जवळगाव व एसएनएस पद्मावती महिला बचतगट, हातोला यांच्यासह गायक सुभाष शेप, मनोज गित्ते, प्रदिप चोपने, आनंद कर्नावट, पंकज भटकर, गायिका मयुरी मजगे, प्रविण दासुद, दत्ता दराडे, अजित सांगळे, गोविंद केंद्रे, दिपाली गित्ते यांचाही सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमास शिक्षण, साहित्य, राजकीय, पत्रकारिता यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अंबाजोगाई तालुका पत्रकार संघ, अ. भा. मराठी पत्रकार परिषद, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, शाखा अंबाजोगाई, तालुका पत्रकार संघ अंबाजोगाई, गुड मॉर्निंग ग्रुप, अंबाजोगाई यांनी प्रयत्न केले.