मुंबई : सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील म्हैसाळ येथील अंबिकानगर मधील एकाच कुटुंबातील 9 जणांनी सामूहिक आत्महत्या केल्याची दुःखद आणि धक्कादायक घटना आज उघडकीस आली आहे.
संवेदनशील मनाला हादरवून टाकणाऱ्या या सामूहिक आत्महत्या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांनी केली आहे.
सामूहिक आत्महत्या प्रकरणात दलित समाजातील दोन सख्ख्या भावांचे कुटुंब असून एकाच वेळी एकाच कुटुंबातील 9 जणांनी विष प्राशन करून आत्महत्या केल्याची ही घटना अत्यंत दुःखद आहे. या आत्महत्ये मागे काय कारण आहे ? याचा शोध घेऊन या सामुहिक आत्महत्येस जबाबदार दोषींवर कठोर कारवाई झाली पाहिजे.
या आत्महत्या प्रकरणाची सखोल चौकशी करावी, या प्रकरणाची मुख्यमंत्र्यांनी दखल घेऊन चौकशी करावी, अशी मागणी ना. रामदास आठवले यांनी केली आहे.