वंचित बहुजन आघाडीने निवेदनाद्वारे केली मागणी
अंबाजोगाई : ऐन पेरणीच्या तोंडावर व्यापाऱ्यांकडून खत, बियाण्यांची कृत्रिम टंचाई दाखवून शेतकऱ्यांची सर्रास लूट केली जात आहे. आणखी पेरणी सुरू झाली नाही तरी ‘मार्केटमध्ये खत बियाण्यांची टंचाई’ हा विषय शेतकऱ्यांसाठी धक्कादायक असून अशा परिस्थितीमध्ये प्रशासन मूग गिळून का गप्प ? असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे.
तसेच दुकानदारास प्रथम दर्शनी स्टॉक बोर्ड लावणे बंधनकारक असते. परंतू, याची अंमलबजावणी एकही दुकानदार करत नाहीत. व्यापाऱ्यांची मुजोरी थांबवून खतांच्या ‘कृत्रिम तूटवड्यातून’ शेतकऱ्यांची सोडवणूक करावी. नसता संबंधित शेतकऱ्यांना सोबत घेऊन वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा मंगळवारी 21 जूनला वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे दिलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे.
या निवेदनावर वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष खाजामिया पठाण, जेष्ठ नेते मारुती सरवदे, रामराजे सरवदे, बालाजी शेळके, महादेव साखरे, वाजीत पठाण, परमेश्वर सरवदे आदीसह शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.