नगरपरिषद प्रशासन मूलभूत सुविधा देण्यात अपयशी ठरले
अंबाजोगाई : नगरपरिषदेच्या सदस्यांचा कार्यकाळ संपल्यामुळे सध्या प्रशासकाचे अधिराज्य आहे. परंतू, प्रशासक शहराला मुलभूत सुविधा पुरवण्याऐवजी इतर कामातच व्यस्त आहेत. ऐन पावसाळ्याच्या तोंडावर नागरिकांना पालिकेच्या विरोधात आंदोलन करण्याची वेळ आली आहे. शहरात गजर आंदोलनाने अखेर अंबाजोगाईकरांच्या मनातील आक्रोश रस्त्यावर उतरला. आज दि.14 जूनला मंगळवारी झोपलेल्या अवस्थेत असलेल्या नगरपरिषद प्रशासनाला जागे करण्यासाठी सर्वपक्षीय गजर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात शहरातील शेकडो नागरिक सहभागी झाले होते.
शहरातील विस्कळीत पाणी पुरवठा, प्रलंबित घरकुलाचे हप्ते, भोगवटाधारकांना घरकुल, स्वच्छता कंत्राटी कामगारावर होणारा अन्याय तसेच महिला उपनगर अभियंत्यांसोबत प्रशासकाने केलेले गैरवर्तन यामुळे अंबाजोगाई शहराची राज्यभर प्रतिमा मलिन झाली आहे. सध्या नगरपरिषदेत प्रशासक आहे का, सत्ताधारी ? असा प्रश्न पडल्याने या आंदोलनाने संपूर्ण अंबाजोगाईकरांचे लक्ष वेधले होते.
अंबाजोगाई शहरातील पावसाळ्यापूर्वीची नाले सफाई झाली नाही, पुरस्थिती निर्माण होणारे नाले, हे मे महिन्याच्या अखेरपर्यंत साफ करणे गरजेचे होते. परंतू, नगरपरिषदेच्या प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे शहराची ओळख दुर्गंधीचे शहर अशी झाली आहे. विविध पक्ष, संघटनांनी निवेदन देऊन, आंदोलने करून देखील प्रशासक आठ-आठ दिवस कार्यालयाकडे फिरकत नसल्यामुळे विविध नागरी समस्यांनी तोंड वर काढले आहे. वेळीच उपाययोजना न केल्यामुळे शहरातील नाल्यांना पुर आल्यावर बहुतांशी घरे पाणी खाली जाण्याची भिती व्यक्त केली जात आहे.
वादग्रस्त मुख्याधिकारी तथा प्रशासक अशोक साबळे यांच्या दुर्लक्षामुळेच शहरात घाणीचे साम्राज्य पसरले असून येत्या काळात शहरात मोठी रोगराई पसरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दर चार दिवसाला पाणी पुरवठा करण्याऐवजी आठ ते पंधरा दिवसाला पाणी पुरवठा केला जात आहे. धनेगावच्या धरणात मुबलक पाणी साठा असतानाही नगरपरिषद प्रशासन जनतेला वेठीस धरण्याचे काम करींत आहे. घरकुल योजनेचे प्रलंबित हप्ते त्वरीत देण्यात यावेत, शहरातील पथदिव्यांचा विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात यावा, भोगवटाधारकांना घरकुल योजनेचा लाभ द्यावा, नगरपरिषदेतील उपनगर अभियंता महिला कर्मचाऱ्यांसोबत मुख्याधिकारी तथा प्रशासक अशोक साबळे यांनी गैरवर्तन केल्याने संबंधित पिडीत महिला अधिकार्याने राज्य महिला आयोगाकडे धाव घेऊन तक्रार केली आहे. अंबाजोगाई नगरपरिषदेची कधी नव्हे ती एवढी बदनामी या प्रशासकामुळे जिल्हाभर झाली आहे.
वरिल सर्व विषयांवर आवाज उठविण्यासाठी तसेच सुस्तावलेल्या नगरपरिषद प्रशासनाला जागे करण्यासाठी ‘आम्ही अंबाजोगाईकर’ या बॅनरखाली शहरात गजर मोर्चा काढण्यात होता. या मोर्चात शहरातील विविध सामाजिक संघटना, राजकीय पक्ष, सामाजिक कार्यकर्त्यांनी शेकडोंच्या संख्येने सहभाग नोंदविला होता. या आंदोलनामुळे शहर पुर्ण ढवळून निघाले. गजर आंदोलनाची सुरूवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या चौकाला अभिवादन करून करण्यात आली होती, हा मोर्चा डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक – नगर परिषद- बसस्थानक – पाटील चौक – मंडी बाजार – गुरूवार पेठ – छत्रपती शिवाजी चौक मार्गे उपजिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला.
या मोर्चात विविध सामाजिक संघटनांनी केलेल्या घोषणाबाजीमुळे नगरपरिषद प्रशासनाची मोठी भंबेरी उडाली होती. अंबाजोगाई नगरपरिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासकांचा अनागोंदी कारभार सुरू असून त्याची तात्काळ चौकशी करून वादग्रस्त मुख्याधिकारी अशोक साबळे यांना निलंबित करण्यात यावे, ही प्रमुख मागणी या आंदोलनातून करण्यात आली.
या आंदोलनात केज मतदार संघाच्या आमदार नमिता मुंदडा, युवानेते अक्षय मुंदडा, माजी उपनगराध्यक्ष सारंग पुजारी, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष सुनिल लोमटे, शेख रहीम शेख रज्जाक, भाजपाचे प्रवक्ते राम कुलकर्णी तालुकाध्यक्ष अच्युत गंगणे, दिलीप सांगळे, अनंत लोमटे, संजय गंभीरे, डॉ. अतुल देशपांडे, दिलीप काळे, शिवसेनेचे शहराध्यक्ष गजानन मुडेगावकर, काँग्रेस पक्षाचे असिफोदिन खतीब, दयानंद कांबळे, ईश्वर शिंदे, रिपाईचे महेंद्र निकाळजे, माजी नगरसेवक शेख नबी, सुरैय्या चौधरी, वंचितचे शैलेश कांबळे, उमेश शिंदे, एमआयएमचे रईसोद्दीन अन्सारी, डॉ. सुधीर धर्मपात्रे यांच्यासह विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, राजकीय पक्षांचे पदाधिकारी व महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.