अंबाजोगाई : शाळेचे नवीन शैक्षणिक वर्ष सोमवारपासून सुरू झाले असले तरी शहरातील प्रत्यक्ष शाळांची घंटा आज दि.15 जूनलाच वाजली आहे. शहरातील प्राथमिक शाळांच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचे मोठ्या उत्साहात गुरुजनांनी गुलाब पुष्प देऊन स्वागत केले. ‘स्वाराती’ परिसरातील दे.बा.ग.श्री. योगेश्वरी नूतन विद्यालयातही विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला.
कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर मागील दोन वर्षे ऑनलाइन पद्धतीने शाळा सुरू होती. पण, यंदाच्या या नव्या शैक्षणिक वर्षात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने ऑफलाइन पद्धतीने शाळा सुरू झाली आहे.
‘स्वाराती’ परिसरातील दे.बा.ग.श्री. योगेश्वरी नूतन विद्यालयात विद्यार्थ्यांच्या प्रवेशोत्सवात 1 ली ते 7 वी च्या सर्व तुकड्यातून प्रातिनिधीक स्वरूपात एक मुलगा व एक मुलगी आणि वर्गशिक्षक यांचे पुस्तके, गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले.
यावेळी विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी सांस्कृतिक विभागाच्या वतीने सर्व महिला शिक्षिकांनी आकर्षक रांगोळी, सजावट, सुशोभिकरण केल्यामुळे सर्व पालक आणि विद्यार्थ्यांचे लक्ष वेधून घेतले होते.
विभाग प्रमुख आर. व्ही. ठाकुर यांनी नवीन शैक्षणिक वर्षाच्या विद्यार्थी व शिक्षकवृंदांना शुभेच्छा दिल्या. यावेळी शिक्षक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.