क्रांतीनगर – लालनगरकडे जाणाऱ्या रस्त्याचे काम निकृष्ट : नगरपरिषदेची बोगस कामांवर‌ पैशांची उधळपट्टी

मुख्याधिकारी तथा प्रशासकांनी घेतलं झोपेचं सोंग

अंबाजोगाई : मराठवाड्यातील चळवळीचं केंद्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अंबाजोगाई नगरपरिषदेचा कारभार चव्हाट्यावर आला आहे. घाणीचे साम्राज्य, 10 दिवसाला पाणी पुरवठा, भ्रष्टाचार यासह आता निकृष्ट दर्जाच्या रस्त्याचाही त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. दुसरीकडे अंबाजोगाईच्या समस्येकडे दुर्लक्ष करित वादग्रस्त मुख्याधिकारी तथा प्रशासकांनी झोपेचं सोंग घेतले आहे. त्यामुळे मुख्याधिकारी, नगरपरिषद प्रशासनाच्या विरोधात संताप व्यक्त करण्यात येत आहे. ‌‌

अंबाजोगाई शहरातील सर्वात मोठी वसाहत म्हणून क्रांतीनगर – लालनगरकडे पाहिले जाते. गोरगरिबांच्या मोठ्या संघर्षातून ही वसाहत उभी राहिली आहे. आता तर या वसाहतीचा खूप मोठा विस्तार झाला आहे.‌ या ठिकाणी बहुतांश मागासवर्गीय आणि अल्पसंख्याक बांधव रहाण्यासाठी असून मोलमजुरी करून ते आपली उपजीविका भागवितात. 

एकीकडे मागासवर्गीय ‌वस्त्यांच्या विकासासाठी सरकार‌ करोडो रुपयांचा निधी वितरित करते, पण दुसरीकडे या निधीचा उपयोग होतोचं असा नाही.‌ क्रांतीनगर – लालनगर वस्तीत हेच घडले आहे. रस्त्यांची दयनीय अवस्था, अनेक ठिकाणी नाल्या नसल्याने रस्त्यावर आलेलं सांडपाणी, या समस्या सोडविण्याची गरज असतानाही फक्त गुत्तेदार पोसण्यासाठी गरज नसलेली कामं ‌‌‌‌‌‌‌‌‌काढयाची आणि पैशाची उधळपट्टी करायची. 

क्रांतीनगर – लालनगरकडे जाणारा रस्ता अगोदरच रुंद होता. या रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले आहेत. गेल्या कित्येक दिवसांपासून या रस्त्यावरून वाहनं चालवताना नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे, खड्डे चुकवताना अनेकदा या रस्त्यावर अपघात झाले आहेत. तरीही हा रस्ता दुरुस्त न करता साईडपट्टीची कामं करायची, ते ही निकृष्ट दर्जाचे. 

क्रांतीनगर – लालनगरकडे जाणाऱ्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला साईडपट्टी करण्यासाठी नगरपरिषदेने गुत्तेदाराला कामं दिले.‌ या गुत्तेदार महाशयांनी रस्त्याच्या दोन्ही बाजूला थोडेसे उकरत‌ मुरुम टाकला, तोही अर्ध्यातचं.‌ कारण पुढे रस्त्याच्या दोन्ही बाजूला ‌या भागातील नागरिकांची घरे आहेत. अर्ध्यातचं‌ खडी टाकली आणि नावाला डांबर‌ टाकून रोडरोलर फिरविले, झालं ‌‌‌‌काम. दुसऱ्याचं दिवशी मोटारसायकलने खडी रस्त्यावर ‌‌‌‌‌येऊन पडली तर काही ठिकाणी उखडून पडली. 

गुत्तेदाराला देऊनही टाकले‌ पैसे

नगरपरिषदेचे चाणाक्ष इंजिनिअर आले, काम पाहिले. काम कसं झालंय, काही नाही. संबंधित गुत्तेदाराला अर्धे ‌पैसैही देऊन टाकले. मुख्याधिकारी तथा प्रशासकांनी झोपेचं सोंग घेतले आहे, ते फक्त पैसे देण्याच्यावेळी जागी होतात, त्यांनीही काम पहाण्याची तसदी घेतली नाही. पैसे मिळाल्यानंतर अजून तो गुत्तेदार कामाकडे फिरकलाच नाही. 

अर्धवट काम पूर्ण करावे

पावसाळा सुरु होत आहे, पावसाळ्यात डांबराची कामं होतील का ? ती टिकतील का ? याच्याशी नगरपरिषदेच्या अभियंत्यांना, मुख्याधिकाऱ्यांना आणि हुशार गुत्तेदारांना काही देणेघेणे नाही. फक्त गुत्तेदार पोसण्यासाठीचं काम करायची असेल तर नगरपरिषदेची तर वाट लागली, अंबाजोगाईची लागल्याशिवाय राहणार नाही. संबंधित गुत्तेदाराने लवकरात लवकर हे गरज नसलेले अर्धवट काम पूर्ण करावे, अशी मागणी या भागातील जनतेकडून करण्यात येत आहे.