नगरपरिषद : प्रभाग क्रमांक 1 मधील नाली कामात, विहीरीतील‌ गाळ काढण्याच्या ‌‌‌‌‌‌कामात ‌‌‌अनियमितता

विभागीय उपायुक्त अ‍ॅॅॅॅॅॅॅॅलिस पोरे यांनी नोंदविले निष्कर्ष

माजी उपाध्यक्ष सारंग पुजारी, माजी नगरसेवक शेख रहीम यांची माहिती

अंबाजोगाई : नगरपरिषदेच्या हद्दीतील प्रभाग क्रमांक 1 मधील नालीच्या बांधकामात आणि कारखाना फिल्टर हाऊस येथील विहीरीच्या गाळ काढण्याच्या कामात वित्तीय व प्रशासकीय अनियमितता झाल्याचे दिसून येते, असे निष्कर्ष नगर परिषद प्रशासन, विभागीय आयुक्त कार्यालय, औरंगाबादच्या उपायुक्त अ‍ॅॅॅॅॅॅॅॅलिस पोरे यांनी नोंदविले आहे. 

सदर अनियमिततेबाबत जिल्हाधिकारी, बीड यांनी जबाबदारी निश्चित करुन योग्य नियमोचीत कार्यवाही त्यांच्या स्तरावर करण्यासाठी अग्रेषित करणे उचित ठरेल, असेही पत्रात नमूद करण्यात आले आहे, अशी माहिती माजी उपाध्यक्ष सारंग पुजारी यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

नगरपरिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांना हाताशी धरून विविध कामांत केलेल्या भ्रष्टाचाराच्या तक्रारी संदर्भात आलेल्या निष्कर्षींची माहिती देण्यासाठी माजी उपाध्यक्ष सारंग पुजारी यांनी हॉटेल कृष्णाई या ठिकाणी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. या पत्रकार परिषदेला अक्षय मुंदडा, माजी नगरसेवक शेख रहीम, सुनिल लोमटे, भाजपाचे प्रवक्ते राम कुलकर्णी यांच्यासह आदींची उपस्थिती होती.

पत्रकार परिषदेत पत्रकारांशी संवाद साधताना सारंग पुजारी म्हणाले की, विभागीय उपायुक्त अ‍ॅॅॅॅॅॅॅॅलिस पोरे यांनी नोंदविलेल्या निष्कर्षींवरुन हे स्पष्ट होते की, नगरपरिषदेचे पदाधिकारी, मुख्याधिकारी, अधिकारी, अभियंते, कर्मचारी हे भ्रष्टाचारात सामील आहेत. नगरपरिषदेत स्वच्छतेत लाखों रुपायांचा भ्रष्टाचार झाला आहे, त्याचीही तक्रार आम्ही जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे. त्याचीही सुनावणी चालू आहे.

मुकुंदराज सभागृहातील लाखो रुपायांच्या खुर्ची घोटाळ्याची सुनावणी पूर्ण झाली आहे, ती देखील रिझर्व्ह फॉर ऑर्डर आहे. सर्वसाधारण सभा न घेण्याची तक्रारही केली आहे, ती देखील प्रलंबित आहे. आम्ही ज्याही तक्रारी केल्या आहेत, त्या पुराव्यानिशी केलेल्या आहेत. हे तर पाच वर्षांतील नगरपरिषदेचे घोटाळे बाहेर काढले आहेत, गेल्या 25 वर्षांत काय झाले ? कोणालाही माहिती नाही. त्याचेही कागदपत्रं मिळाली तर आम्ही रितसर तक्रारी करणार आहोत, असेही पुजारी यांनी सांगितले.

पत्रकार परिषदेत पुढे बोलताना पुजारी म्हणाले की, काहीजण निवडणूक डोळ्यासमोर ठेवून तक्रारी करतं आहेत, असा आरोप आमच्यावर करित आहेत. परंतू, आम्ही तक्रारी दाखल केलेल्या तारखा, सुनावण्या यांच्या तारखा तपासून पहा, निश्चित उत्तर मिळेल.

अंबाजोगाईतील नागरिकांना होणारा त्रास, नगरपरिषदेचा पैसा लुबाडणारे संबंधित पदाधिकारी, अधिकारी यांचा न्यायनिवाडा एकनाएक दिवस होणार आहे.‌ नगरपरिषदेत झालेल्या भ्रष्टाचाराच्या तक्रारी संदर्भात सुनावण्या चालू आहेत, त्याचेही निकाल लवकरच हाती येतील. यात संबंधित पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी यांच्यावर निश्चितच कार्यवाही होणार आहे, असेही पुजारी यांनी सांगितले.

मंगळवारी गजर आंदोलन

नगरपरिषद आणि उपविभागीय कार्यालयावर ‘आम्ही अंबाजोगाईकर’ म्हणून आणि सर्वपक्षीय नेते, कार्यकर्ते मंगळवारी गजर आंदोलन करणार आहोत. अंबाजोगाईतील नागरिकांच्या समस्येबाबत, प्रश्र्नाबाबत आम्ही वेळोवेळी नगरपरिषद, उपजिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदन दिले. त्या निवेदनाचे कूठलेच उत्तर आले नाही, प्रशासकीय कार्यवाही झाली नाही. त्यामुळे झोपलेल्या प्रशासनाला जागी करण्यासाठी उद्या मंगळवारी गजर आंदोलन करणार आहोत, असेही सारंग पुजारी यांनी सांगितले.