अंबाजोगाईकरांना होतोय त्रास : नागरिकांत असंतोष
अंबाजोगाई : नगरपरिषद, अंबाजोगाई सध्या चर्चेचं केंद्र झालं असून मुख्याधिकाऱ्यांच्या निष्काळजी पणामुळे संबंध अंबाजोगाईकरांना त्रास सहन करावा लागत आहे. गेल्या 8 दिवसांपासून कंत्राटी स्वच्छता कामगार संपावर गेले असल्याने शहरातील स्वच्छतेचा प्रश्न गंभीर बनला आहे. घंटागाड्याही बंद असल्याने कचरा टाकायचा कुठे ? असाही प्रश्न अंबाजोगाईकरांना सतावत आहे. दरम्यान याकडे नगरपरिषद प्रशासन मात्र दुर्लक्ष करित डोळेझाक करित आहे. नगरपरिषद प्रशासनाच्या या बेफिकीर वृत्ती विरोधात तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.
अंबाजोगाई नगरपरिषदेच्या वतीने शहरातील स्वच्छतेसाठी दरवर्षी लाखों रुपायांचे कंत्राट दिले जाते. यात कंत्राटदारांकडून शहरातील स्वच्छता, घंटागाड्याने विविध प्रभागातील कचरा गोळा करणं, नाली सफाईचे कामं करुन घेतली जातात. ही कामं करुन घेण्यासाठी जुन्या कंत्राटदारांकडे जवळपास 120 स्वच्छता कामगार रोजंदारीवर गेल्या 10 ते 12 वर्षांपासून कामावर आहेत. या कामगारांनी वाढीव रोजंदारीसाठी तीन वर्षांपूर्वी नगरपरिषदेसमोर आमरण उपोषणाचे आंदोलन केले होते. यात तत्कालीन मुख्याधिकाऱ्यांनी कामगारांना नवीन कंत्राटात 500 रुपये रोजंदारी देण्याचं लेखी आश्वासन दिले होते.
नगरपरिषदेच्या वतीने 1 जूनला शहरातील स्वच्छतेसाठी नवी मुंबईतील अशोका एंटरप्रायजेस या एजन्सीला कंत्राट दिले आहे. कंत्राट दिल्यापासून कंत्राटदाराने अंबाजोगाईकडे पाठ फिरवली आहे. तर दुसरीकडे कामगारांशी अजूनही कंत्राटदाराने बोलणी केली नाही. नवीन कंत्राट दिल्याने रोजंदारी कर्मचारीही 500 रुपयांच्या वाढीव रोजंदारीसाठी आडून बसले आहेत. वाढीव रोजंदारी दिल्याशिवाय कामगार कामावर येणार नाहीत, असा इशाराच स्वच्छता कामगारांनी दिला आहे.
या घटनेला आज 9 दिवस पुर्ण झाले तरी नगरपरिषद प्रशासनाने कुठलीच भूमिका घेतली नाही. त्यामुळे शहरातील विविध प्रभागातील स्वच्छता, कचरा, नाली सफाईचे कामं बंद असल्याने नागरिकांचं आरोग्य धोक्यात आले आहे. मुख्याधिकाऱ्यांच्या एकाधिकारशाहीचा परिणाम नगरपरिषद प्रशासनावर होत आहे आणि याचा त्रास अंबाजोगाईकरांना सहन करावा लागत आहे. त्यामुळे मुख्याधिकारी, नगरपरिषद प्रशासनावर जनतेचा असंतोष वाढू लागला आहे. नगरपरिषद प्रशासनानं तात्काळ या विषयी निर्णय घेऊन अंबाजोगाईकरांच्या आरोग्याचं रक्षण करावे, अशी मागणी जनतेतून होऊ लागली आहे.
नगरपरिषद कार्यालयासमोर 13 जूनला गजर आंदोलन
अंबाजोगाईत स्वच्छतेसाठी कंत्राटदार नेमला आहे. मात्र तो कंत्राटदार आजही अवतारलाच नाही. शहरातील प्रत्येक वॉर्डात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. जनतेचे आरोग्य धोक्यात आले आहे. पावसाळ्यापूर्वी सर्व नाले साफसफाईचे कामं करणे अपेक्षित असते, ते काम झालेच नाही. पाच जून रोजी कंत्राटदार कामाला सुरुवात करणार होता. आजही कोणीही स्वच्छता करत नाही.
स्वच्छता निरीक्षक रजेवर, सीओ कार्यालयात बसत नाहीत. प्रशासन कोण चालवणार ? असा प्रश्न उपस्थित करत नगरपरिषद प्रशासनाचे पूर्णत: दुर्लक्ष होत आहे, यासह आदी मागण्या जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात केलेल्या आहेत.
निवेदनावर मुंदडा समर्थक माजी नगरसेवक सारंग पुजारी, शेख रहीम भाई, सुनील लोमटे, अनंत लोमटे, संजय गंभीरे, सुरेश कराड, प्रदीप दहिवाळ, हनुमंत तौर, शेख ताहेर भाई, बाला पाथरकर, मयूर रणखांब आदींच्या सह्या आहे. त्यात येत्या 13 जून रोजी नगरपरिषद कार्यालयासमोर गजर आंदोलनं करण्याचेही जाहीर करण्यात आले आहे.