राजकारण हे नैतिकतेवर आधारित असले पाहिजे‌ – केंद्रिय राज्यमंत्री ना. रामदास आठवले

प्राचार्य डॉ. कमलाकर कांबळे यांचा भव्य नागरी सत्कार

अंबाजोगाई : महाराष्ट्रात पँथरची चळवळ उभी राहिली, या चळवळीला साहित्यिकांनी वेळोवेळी पाठबळ व नवी दिशा दिली. आंबेडकरी चळवळीसाठी आणि माझ्या जडण – घडणीत प्राचार्य डॉ. कमलाकर कांबळे यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे, असे गौरवोद्गार केंद्रिय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी काढले. अंबाजोगाईत प्राचार्य डॉ. कमलाकर कांबळे यांच्या सेवानिवृत्ती प्रित्यर्थ आयोजित नागरी सत्कार समारंभाचे प्रमुख अतिथी म्हणून ना. आठवले हे बोलत होते.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अंबाजोगाईचे माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी होते तर विचारमंचावर शिक्षक आमदार विक्रम काळे, माजी कुलगुरू मधुकरराव गायकवाड, रिपाइंचे युवक प्रदेशाध्यक्ष पप्पु कागदे, प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सिद्धार्थ भालेराव, भाजपाचे प्रदेश प्रवक्ते राम कुलकर्णी, डॉ. नरेंद्र काळे, प्रा. सुशिलाताई मोराळे, रामचंद्र तिरूके, सत्कारमूर्ती प्राचार्य डॉ. कमलाकर कांबळे, विद्या कमलाकर कांबळे, अ‍ॅड. अनंतराव जगतकर, चंद्रकांत चिकटे यांच्यासह मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. 

यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलताना ना. रामदास आठवले म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जगाला सामाजिक समतेचा मुलमंत्र दिला. याच धर्तीवर राजकारण्यांनी नितीमत्तेवर आधारलेले राजकारण केले पाहिजे. महाराष्ट्रात सध्या जी राजकीय स्थिती आहे. ती बदलली पाहिजे. सर्व जाती – धर्म एकत्रित येवून मानवता धर्म जोपासण्यासाठी पुढाकार घेतील, अशी अपेक्षा आठवले यांनी व्यक्त केली. प्राचार्य डॉ. कमलाकर कांबळे हे पँथरच्या चळवळी पासून माझे सहकारी असून शिक्षण क्षेत्रातही सामान्य विद्यार्थ्यांना त्यांनी न्याय दिला. अनेक विद्यार्थ्यांना स्वतःची ओळख दिली. भाशिप्र शिक्षण संस्थेत ते 19 वर्षे प्राचार्य राहिले. ही गौरवाची बाब आहे. विद्यार्थ्यांना अन्यायाविरूद्ध उभे करून शिक्षण हाच प्रगतीचा महामार्ग आहे, ही बाबासाहेबांची शिकवण अचारणात आणल्यानेच ते विद्यार्थीप्रिय शिक्षक ठरले. सेवानिवृत्ती नंतर प्राचार्य कांबळे हे आता आमच्या सोबत कार्यरत राहतील. त्यांचा सन्मान ठेवत भविष्यात त्यांच्यावर रिपाइंच्या वतीने मोठी जबाबदारी देण्यात येणार असल्याचे आठवले यांनी यावेळेस जाहीर केले. 

याप्रसंगी आपल्या सत्काराला उत्तर देताना प्राचार्य डॉ. कमलाकर कांबळे म्हणाले की, 36 वर्षे अध्यापनाचे काम करीत असताना 19 वर्षे प्राचार्य म्हणून भाशिप्र संस्थेने विश्वासाने माझ्यावर जबाबदारी दिली. त्याबद्दल संस्थेचे धन्यवाद मानतो, त्या जबाबदारीच्या माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांना न्याय देता आला. प्रामाणिकपणे काम केल्यास समाज आपल्याला भरभरून आशिर्वाद देतो याची प्रचिती आली. आगामी काळात अंबाजोगाईची मान उंचावेल असेच काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच प्राचार्य कांबळे यांनी आपल्या भाषणात अंबाजोगाईत मराठी भाषेचे विद्यापीठ व्हावे, मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, अंबाजोगाई – लातूर व घाटनांदुर – अंबाजोगाई हा रेल्वे मार्ग अस्तित्वात यावा, अशा मागण्या केंद्रीय राज्यमंत्र्यांकडे केल्या.

यावेळी अध्यक्षीय समारोप करताना राजकिशोर मोदी म्हणाले की, प्राचार्य डॉ. कमलाकर कांबळे यांचे शैक्षणिक क्षेत्रासोबतच साहित्यीक व सांस्कृतिक क्षेत्रात मोठे योगदान आहे. अंबाजोगाई व परिसरात प्राचार्य कांबळे यांनी उभा केलेल्या सामाजिक चळवळीमुळे अनेकांच्या जीवनात परिवर्तन झाले. अनेक गरजू, होतकरू विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यात त्यांचे मोठे योगदान आहे. प्राचार्य कांबळे सेवानिवृत्त झाले असले तरी आता सामाजिक चळवळ पुढे नेण्यासाठी ते आग्रेसर राहतील, अशी अपेक्षा मोदी यांनी व्यक्त केली. 

यावेळी शिक्षक आमदार विक्रम काळे, माजी कुलगुरू मधुकरराव गायकवाड, पप्पु कागदे, रामभाऊ कुलकर्णी, रामचंद्र तिरूके, प्रा. स्नेहल पाठक, प्रा. डाॅ. शंकर वाघमारे यांनी आपले समायोचित मनोगत व्यक्त केले. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्राचार्य डॉ. कमलाकर कांबळे व विद्या कमलाकर कांबळे यांना शाल, पुष्पगुच्छ, स्मृतीचिन्ह, सन्मानपत्र देवून सन्मानित करण्यात आले. दिप्रपज्ज्वलन व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून कार्यक्रमास प्रारंभ झाला.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सत्कार समितीचे अ‍ॅड. सुनिल सौंदरमल यांनी केले. उपस्थित पाहुण्यांचे स्वागत प्रा. डी. जी.धाकडे, मुजीब काझी, डॉ. राहुल धाकडे, विनोद पोखरकर, महेंद्र निकाळजे, अविनाश मुडेगावकर, दशरथ सोनवणे, महादू मस्के, भारत खांडके, डॉ.सर्जेराव काशिद, एस. एम. बगाडे, शशिकांत सोनकांबळे, रामकिशन बडे आदींसह इतरांनी केले. सन्मानपत्राचे वाचन प्रा. डॉ. संजय जाधव यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. मेघराज पवळे यांनी करून उपस्थितांचे आभार प्रा. डी. जी. धाकडे यांनी मानले. या कार्यक्रमास राजकीय, शैक्षणिक, पत्रकारिता, साहित्य ‌क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती.

अंबाजोगाई – लातूर रेल्वे मार्गासाठी पाठपुरावा करु

अंबाजोगाई ते घाटनांदुर हा रेल्वे मार्ग नव्याने अस्तित्वात यावा, यासाठी आपण केंद्रिय रेल्वे मंत्री यांच्याकडे पाठपुरावा करणार आहोत. या रेल्वे मार्गाच्या सर्व्हेसाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल. तसेच अंबाजोगाई येथे आद्यकवी मुकुंदराज स्वामी यांच्याच भूमित मराठी भाषेचे विद्यापीठ व्हावे, यासाठी केंद्र सरकारकडून लागणारी मदत उपलब्ध करून देण्याचे आश्‍वासन केंद्रिय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांनी दिले. त्याचे अंबाजोगाईकरांकडून स्वागत करण्यात आले.