अंबाजोगाईत चाललंय तरी काय ? मुख्याधिकाऱ्यांच्या विरोधात ढीगभर तक्रारी, कार्यवाही शून्य

मुख्याधिकाऱ्यांची हकालपट्टी करा : शिवसेना महिला आघाडी

मुख्याधिकाऱ्यांच्या विरोधात असंतोष वाढू लागला 

अंबाजोगाई‌ : नगरपरिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी यांनी सहाय्यक महिला कर्मचारी (उपनगर अभियंता) यांच्यासोबत गैरवर्तणुक केल्याबद्दल व नगरपरिषदेतील दैनंदिन अनागोंदी कारभाराबाबत मुख्याधिकारी यांच्यावर तात्काळ निलंबनाची कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी बहुतांश राजकीय पक्षांकडून, सामाजिक आणि महिला संघटनांकडून होत आहे. 

मुख्याधिकाऱ्यांच्या विरोधात ढीगभर तक्रारी उपजिल्हाधिकारी आणि जिल्हाधिकारी यांच्याकडे देण्यात आलेल्या आहेत. परंतू, अजूनही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वादग्रस्त मुख्याधिकाऱ्यांच्या विरोधात कुठलीच कार्यवाही केलेली दिसत नाही. अंबाजोगातील‌ वरिष्ठ अधिकारी फक्त निवेदन स्वीकारायलाच आहेत कां ? असा सवाल सामान्य जनतेतून केला जात आहे. 

मुख्याधिकारी यांच्यावर वरिष्ठ अधिकारी कार्यवाही करत नसल्याने त्यांच्या विरोधात अंबाजोगाईत असंतोष वाढू लागला आहे. दरम्यान आजही शिवसेना महिला आघाडीच्या वतीने वादग्रस्त मुख्याधिकाऱ्यांची हकालपट्टी करण्यात यावी, असे निवेदन देण्यात आले आहे.

नगरपरिषदेचा कारभार मुख्याधिकाऱ्यांनी हातात घेतल्यापासून चांगलेच चर्चेत राहिले आहेत.‌ सततची गैरहजेरी, कार्यालयातचं बसून कारभार हाकणे, कर्मचाऱ्यांना हीन‌ वागणूक देणे तर कधी कर्मचाऱ्यांच्या पगारी रोखणे आणि असभ्य भाषा वापरणं. महिलांना दुय्यम दर्जाची वागणूक देत त्रास देणं. याची तक्रार तर एका महिला अभियंत्यांनं थेट राज्य महिला आयोगाकडे केली आहे. त्यामुळे मुख्याधिकाऱ्यांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून त्यांच्या या कामाचा परिणाम नगरपरिषद प्रशासनावर झाला आहे आणि असल्या ढिसाळपणाच्या कारभारामुळे अंबाजोगाईकरही त्रस्त झाले आहेत.

मुख्याधिकाऱ्यांची हकालपट्टी करा : शिवसेना महिला आघाडी

अंबाजोगाई नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांच्या विरोधात आज शिवसेना महिला आघाडीच्या वतीने निवेदन दिले आहे. या निवेदनात म्हटले आहे की, अंबाजोगाई नगरपरिषदेचे मुख्याधिकारी शहरात आल्यापासून नगरपरिषद विविध भ्रष्टाचाराच्या प्रकरणी चर्चेत राहीली आहे. आता तर येथील महिला अभियंत्यांनी मुख्याधिकारी त्रास देत आहेत म्हणुन राज्य महिला आयोगाकडे तक्रार केली आहे, तशी महिला आयोगाची नोटीसही आल्याची माहिती आहे, यामुळे शहरात मुख्याधिकाऱ्यांच्या विरोधात संताप व्यक्त केला जात आहे.

मध्यंतरी पदोन्नती होऊनही त्यांना येथेच ठेवण्यात आले होते. त्यांची निष्क्रिय मुख्याधिकारी म्हणून गणना होत आहे, कार्यालयास येणाऱ्या लोकप्रतिनिधींचा अपमान करणे, फोन ब्लॅकलिस्टमध्ये टाकणे आदी कारणांमुळे मुख्याधिकाऱ्यांच्या विरोधात संतापाची लाट उसळली आहे, तेव्हा यांची येथून उचलबांगडी करावी, अशी मागणी शहरप्रमुख गजानन मुडेगावकर यांनी उपजिल्हाधिकारी यांच्या मार्फत नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आणि संचालक नगरविकास विभाग यांना निवेदन देऊन केली आहे.

तसेच मागील अनेक वर्षांपासून नगरपरिषद येथे चिटकून बसलेले व पाच वर्षांपेक्षा जास्त कार्यकाळ झालेल्या काही अधिकाऱ्यांच्या बदल्या कराव्यात, अशीही मागणी या निवेदनात केली आहे. मुख्याधिकाऱ्यांवर योग्य ती कार्यवाही झाली नाही तर शिवसेना स्टाईलने आंदोलन केले जाईल, असा इशारा केज मतदार संघाचे संपर्क प्रमुख परशुराम जाधव यांनी दिला आहे.

यावेळी केज मतदार संघाचे संपर्कप्रमुख परशुराम जाधव, उपजिल्हाप्रमुख शिवाजी कुलकर्णी, तालुकाप्रमुख अर्जुन वाघमारे, शहरप्रमुख गजानन मुडेगावकर, जिल्हा सहसंघटक अशोक गाढवे, महिला आघाडीच्या जयश्री पिंपरे, अ‍ॅड. सुनीता जोशी, युवती सेनेच्या सुनीता जाधव, रेखा घोबाळे, जयश्री मोरे, उपशहरप्रमुख गणेश जाधव, शहर समन्वयक अर्जुन जाधव, युवासेना तालुकाप्रमुख अक्षय भूमकर, हनुमंत हावळे, गणेश देवकते, बप्पा वाघमोडे, श्रीमंत आगळे, अ‍ॅड. विशाल घोबाळे यांच्यासह महिला व शिवसैनीक उपस्थित होते.