मुंबई : स्त्रियांवरील अत्याचारांच्या प्रश्नाबरोबरच एका प्रेमकहाणीवर आधारित ‘आठवा रंग प्रेमाचा’ या चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियात लॉन्च करण्यात आला. 17 जूनला प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटात रिंकू राजगुरुनं असिड व्हिक्टिमची भूमिका करत पहिल्यांदाच प्रोस्थेटिक मेकअप केला आहे. अॅॅॅॅॅॅॅॅन्टॉप अँगल प्रॉडक्शनच्या समीर कर्णिक यांनी या चित्रपटाची निर्मिती केली असून आदिनाथ पिक्चर्सच्या आशिष भालेराव, राकेश राऊत प्रॉडक्शन्स यांनी चित्रपटाची प्रस्तुती केली आहे.
चित्रपटाची कथा, दिग्दर्शन खुशबू सिन्हा यांचे असून त्यांचा हा पहिलाच चित्रपट आहे. चित्रपटाची पटकथा, संवाद समीर कर्णिक यांचे असून समीर कर्णिक यांनी ‘क्युं हो गया ना..’ या आपल्या पहिल्याच चित्रपटापासून बॉलिवूडमध्ये दिग्दर्शक म्हणून छाप पाडली होती. त्यानंतर ‘यमला पगला दिवाना’, ‘चार दिन की चांदनी’, ‘हिरोज’ अशा चित्रपटांची निर्मिती, दिग्दर्शन समीर कर्णिक यांनी केलं.
चित्रपटाचे अतिरिक्त संवाद हृषीकेश कोळीचे आहेत. चित्रपटाचे छायाचित्रण दुलीप रेमि यांचे आहे. रोहित गवंडी, वलय मुळगुंड, जय अत्रे, आतिक अलाहाबादी यांनी लिहिलेल्या गाण्यांना संगीत प्रिनी सिद्धांत माधव आणि मार्क डी म्यूज यांचे आहे.
मकरंद देशपांडे, रिंकू राजगुरू आणि विशाल आनंद हा या चित्रपटातून पदार्पण करत आहे. खुशबू सिन्हा यांनी दिग्दर्शकीय पदार्पणातच वेगळ्या धाटणीचा चित्रपट केला आहे. ज्येष्ठ अभिनेते मकरंद देशपांडे, रिंकू राजगुरू यांच्या चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत, तर विशाल आनंद हा नवा अभिनेता या चित्रपटातून पदार्पण करत आहे.