‘हर हर महादेव’ : पाच भारतीय भाषांमध्ये घुमणार शिवगर्जना

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्य, त्यांची थोरवी याचं आकर्षण, कुतूहल आजही अनेकांच्या चर्चेचा, अभ्यासाचा विषय असतो. महाराजांचा हाच महिमा भव्य दिव्य स्वरूपात सर्वांसमोर येणार आहे  ‘हर हर महादेव’ या चित्रपटातून. हा चित्रपट मराठीसह हिंदी, तामिळ, तेलगू आणि कन्नड या भाषांमध्ये एकाच दिवशी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. 

मराठी चित्रपटांच्या इतिहासात आजवर कधीही न घडलेली अशी ही घटना ‘हर हर महादेव’ च्या निमित्ताने घडणार आहे. अभिजित देशपांडे यांच्या लेखन आणि दिग्दर्शनाने सजलेला हा चित्रपट दिवाळीमध्ये प्रदर्शित होईल. याबद्दल बोलताना झी स्टुडिओजचे व्यवसाय प्रमुख मंगेश कुलकर्णी म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्यच इतकं महान आणि भव्य आहे की ते फक्त महाराष्ट्रापुरतं मर्यादित राहू शकत नाही. महाराजांची युद्धनीती, संघटन कौशल्य जगभरात अभ्यासलं जातं. 

आज इतर भाषांमधील काल्पनिक गोष्टी आपल्याला मोहवून टाकत आहेत. त्यामुळे आपला खरा, प्रेरणादायी आणि देदीप्यमान असा इतिहास तेवढ्याच भव्यतेने जगासमोर आलाच पाहिजे, ही भावना आमच्या मनात होती. या भावनेतूनच आम्ही ‘हर हर महादेव’ सर्व भारतात पाच भाषांमध्ये प्रदर्शित करायचं ठरवलं आहे. 

या चित्रपटाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे याची व्हिएफएक्स टीम. अनेक हॉलिवूडपटांवर काम करणारे व्हिएफएक्स तंत्रज्ञ यावर काम करत असून तब्बल 400 हुन अधिक तंत्रज्ञांचा यात समावेश आहे. सुनील फडतरे यांच्या श्री गणेश मार्केटिंग आणि झी स्टुडिओजची निर्मिती असलेल्या या चित्रपटाचं दिग्दर्शन अभिजित देशपांडे यांचं आहे.