उपजिल्हाधिकारी यांना दिले निवेदन : शहरातील मुस्लीम बांधव मोठ्या संख्येने सहभागी
अंबाजोगाई : प्रेषित मोहम्मद यांच्याबद्दल अपशब्द वापरून मुस्लीम धर्मियांच्या भावना दुखावल्या प्रकरणी भाजपच्या राष्ट्रीय प्रवक्त्या नुपूर शर्मा आणि त्यांचे विधान प्रसारित करणारी वृत्तवाहिनी यांच्यावर कडक कायदेशीर कार्यवाही करावी, या मागणीसाठी अंबाजोगाईत सोमवार दिनांक 6 जूनला सकाळी निषेध मोर्चा काढण्यात आला.
शहरातील मुस्लीम समाज बांधव या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. दरम्यान, अतिशय शांततेत आणि शिस्तीत हा मोर्चा पार पडला. यावेळी अंबाजोगाई शहर पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
एका वृत्तवाहिनीवर चर्चेत भाजपाच्या राष्ट्रीय प्रवक्त्या नूपुर शर्मा यांनी प्रेषित मोहम्मद यांच्याबद्दल अवमानकारक टिप्पणी केली. याचा निषेध करण्यासाठी आणि नुपूर शर्मांवर कायदेशीर कार्यवाहीच्या मागणीसाठी अंबाजोगाईत मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. अंबाजोगाई शहरातील सदर बाजार येथून या निषेध मोर्चास सुरुवात झाली. छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे हा मोर्चा बस स्थानकापर्यंत जाऊन तिथून उपजिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. मोर्चात निषेधाचे फलक झळकावत हजारोंच्या संख्येने आबालवृद्ध सामील झाले होते.
यावेळी उपजिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नुपूर शर्मा यांनी प्रेषित मोहम्मद यांच्याबद्दल अवमानकारक शब्द वापरून त्यांचा अपमान केला आहे. यामुळे समस्त मुस्लीम धर्मियांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. शर्मा यांनी हे कृत्य जाणीवपूर्वक केलेले असून ते समाजामध्ये तेढ निर्माण करणारे आहे. तसेच संबंधित वृत्तवाहिनीने हे वृत्त जाणीवपूर्वक प्रसारित करून त्याचा प्रसार केला. त्यामुळे नुपूर शर्मा आणि सदरील वृत्तवाहिनीवर गुन्हा नोंद करून कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. या निवेदनाच्या प्रती राष्ट्रपती, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, गृहमंत्री यांनाही पाठविण्यात आल्या आहेत.