सत्कार समारंभाला मोठ्या संख्येने उपस्थित रहावे – संयोजन समितीचे आवाहन
अंबाजोगाई : भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेच्या विविध महाविद्यालयातून प्राध्यापक आणि प्राचार्य म्हणून मागील 36 वर्षे शिक्षण सेवा करून निवृत्त झालेले अंबाजोगाईकरांचे लाडके व बहुआयामी व्यक्तिमत्व तथा कला, साहित्य, संस्कृती, समाज आणि शिक्षण या क्षेत्रात ज्यांनी उल्लेखनीय कार्य केले आहे.
विद्यापीठ नामांतर चळवळ, मराठवाडा विकास, अंबाजोगाई जिल्हा निर्मिती, मराठी भाषेचे विद्यापीठ निर्मिती यासाठी सक्रीय असलेले प्राचार्य डॉ. कमलाकर कांबळे यांच्या नागरी सत्कार समारंभाचे आयोजन बुधवार, दिनांक 8 जून 2022 रोजी अंबाजोगाई शहरात करण्यात आले आहे. या कार्यक्रमास केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री, भारत सरकार तथा रिपाइंचे राष्ट्रीय नेते रामदास आठवले यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे. तरी या कार्यक्रमास अंबाजोगाईकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात येत आहे.
बुधवार, दिनांक 8 जूनला अंबाजोगाई शहरात आद्यकवी मुकुंदराज सांस्कृतिक सभागृहात सकाळी 10:30 वाजता आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी तर यावेळेस विचारमंचावर आ. नमिता मुंदडा आ. विक्रम काळे, आ. संजय दौंड, प्रा. मधुकरराव गायकवाड, रिपाइंचे पप्पु कागदे, चेअरमन रमेशराव आडसकर, बहुजन विकास मोर्चाचे बाबुराव पोटभरे, राम कुलकर्णी, डॉ. सिद्धार्थ भालेराव, जेष्ठ पत्रकार अमर हबीब, रामचंद्र तिरूके, माजी आमदार पृथ्वीराज साठे, प्रा. एस. के. जोगदंड, राष्ट्रवादीचे बीड जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण, काँग्रेसचे बीड जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख, डॉ. नरेंद्र काळे आणि अॅड. अनंतराव जगतकर या मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
कार्यक्रमाच्या नियोजनासाठी नुकतीच अंबाजोगाई शहरात एक बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत सत्कार संयोजन समिती तयार करण्यात आली आहे. या समितीत सामाजिक, राजकीय, साहित्य, संगीत, शिक्षण, सहकार, पत्रकारिता, रोटरी, ज्येष्ठ नागरिक संघ, शेती, ज्येष्ठ नागरिक महिला संघ, वैद्यकीय, विधी, उद्योग यासह इतर सर्व क्षेत्रात कार्यरत सन्माननिय मान्यवरांचा समावेश आहे.
या नागरी सत्कार समारंभास अंबाजोगाई शहर व परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन आयोजक प्रा. डी. जी. धाकडे, अॅड. सुनिल सौंदरमल, दगडु लोमटे, अॅड. किशोर गिरवलकर, मुजीब काझी, विनोद पोखरकर आदींसह सत्कार संयोजन समितीकडून करण्यात येत आहे. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी आधार मल्टीस्टेट को – ऑपरेटिव्ह क्रेडीट सोसायटी, लि. शाखा, अंबाजोगाई यांनी पुढाकार घेतला आहे.