अंबाजोगाई : नगरपरिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी यांनी सहाय्यक महिला कर्मचारी (उपनगर अभियंता) यांच्यासोबत गैरवर्तणुक केल्याबद्दल व नगरपरिषदेतील दैनंदिन अनागोंदी कारभाराबाबत मुख्याधिकारी यांच्यावर तात्काळ निलंबनाची कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी उपजिल्हाधिकारी यांच्यासह जिल्हाधिकारी यांच्याकडे आज दिनांक 30 मे रोजी देण्यात आलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
या संदर्भात देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सद्यस्थितीत जानेवारी 2022 पासून नगरपरिषद, अंबाजोगाईला प्रशासकाची नेमणूक करण्यात आली असून सद्याचे मुख्याधिकारी यांनाच शासनाने प्रशासक व मुख्याधिकारी म्हणून पदभार दिलेला आहे. ही दोन्ही पदे त्यांच्याकडेच असल्याने नगरपरिषद प्रशासन हे एककलमी चालवत आहेत.
गेल्या कांही दिवसापासून वर्तमानपत्रात महिला कर्मचारी उपनगर अभियंता यांनी महिला आयोगाकडे मुख्याधिकारी यांनी दिलेल्या त्रास व गैरवर्तणुकीबाबत लेखी तक्रार दिल्याचे समोर आले आहे. शासनाने ज्या कर्मचाऱ्याची नियुक्ती ज्या कामासाठी केलेली असतांना मुख्याधिकारी हे दुसऱ्या आस्थापनेच्या कामांसाठी त्यांची नियुक्ती करुन कामे करुन घेत आहेत. तसेच महिला कर्मचारी यांना कार्यालयामध्ये जाणिवपुर्वक दोन – दोन तास उशिरा बसवून घेत आहेत. त्यांच्याबर दबाब टाकत आहेत. ही अत्यंत गंभीर बाब असून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी व महिला कर्मचाऱ्यास न्याय मिळवून देण्यात यावा.
सद्यास्थितीत असणारे मुख्याधिकारी यांचा कार्यकाळ हा वादग्रस्त असून त्यांच्या कारभाराविषयी व विकास कामातील गैरव्यवहाराबाबत अनेक तक्रारी दाखल आहेत. त्यापैकी काही तक्रारी जिल्हाधिकारी – बीड, उपविभागीय आयुक्त, औरंगाबाद यांच्यासमोर सुनावणी चालू आहे. त्यांचे ही निकाल प्रलंबित आहेत. मुख्याधिकारी हे गेल्या 15 दिवसांपासून मुख्यालय सोडून बाहेर होते. प्रत्यक्षात त्यांनी जिल्हाधिकारी यांची रितसर परवानगी घेणे बंधनकारक असतांना फक्त 3 दिवसाचा रजेचा अर्ज जिल्हाधिकारी कार्यालयास पाठवलेला आहे, तो देखील मंजुर झाला किंवा नाही याबाबत साशंकता आहे.
सद्यास्थितीत अंबाजोगाई शहरात स्वच्छता, 10 ते 12 दिवसाला होणारा पाणी पुरवठा, मुख्य पाईपलाईनवरील लिकेजेस, पंतप्रधान आवास योजनेतील घरकुलांचे हप्ते, घंटागाड्या संबंधी समस्या, विविध विभागातील कार्यालय प्रमुखांची अनुपस्थिती, शहरात चालू असलेले रस्ते, नाल्यांच्या गुणवत्तेविषयी प्रश्र्न अशा अनेक अडचणींना नागरिकांना सामोरे जावे लागत असून नागरिकांच्या तक्रारींचे निराकरण होत नाही.
तसेच नगरपरिषद मधील काही विशिष्ट कर्मचाऱ्यांचे वेतनतन रोखणे, सहाय्यक महिला कर्मचारी यांच्यासोबत केलेली गैरवर्तणुक यामुळे नगरपरिषद कर्मचाऱ्यांची मानसिकता ढासळत आहे. मुख्याधिकारी यांच्या अनागोंदी कारभारामुळे अंबाजोगाई शहराचे नाव खराब होत असून नागरिकांमध्ये संभ्रम निमाण होत आहे. तरी आपणास विनंती करण्यात येते की, आपण या सर्व बाबींचा विचार करुन वादग्रस्त असणारे प्रशासक तथा मुख्याधिकारी यांचे तात्काळ निलंबन करुन योग्य ती कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
या निवेदनावर नंदकिशोर मुंदडा, शेख रहिम भाई, नुर पटेल, सारंग पुजारी, शेख खलील मौलाना, डॉ. अतुल देशपांडे, संजय गंभीरे, शेख नबी शेख चाँद, शेख ताहेर भाई, ताहेर चाउस, कल्याण काळे, तय्यब बाबा, डॉ. पाचेगावकर, राहुल कापसे, अमोल पवार, अमोल विडेकर, दिग्विजय लोमटे, मतीन बागवान, अहमद पप्पूवाले, महेश अंबाड, शेख ईरशाद, समीर लाटा, मयुर रणखांब, पद्भनाभ देशपांडे, शोयेब कुरेशी, अजीज गवळी, मंगेश शेप, सय्यद दानीश, जुनेद एनबी, गौरव लामतुरे, अमोल वेडे, आसिफ नौरंगाबादी, महमद पप्पुवाले, श्रीकांत खुणे यांच्यासह आदींच्या सह्या आहेत.