अंबाजोगाई पिपल्स को-ऑप बँकेच्या वतीने आयोजित ‘चला सोबत चालू या’ उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद

प्रत्येकाने आपल्या स्वतःच्या आरोग्यासाठी दररोज सकाळी किमान अर्धा तास द्यावा – राजकिशोर मोदी

अंबाजोगाई : अंबाजोगाई पिपल्स को-ऑप बँकेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित नागरिकांच्या आरोग्यासाठी ‘चला सोबत चालू या’ या उपक्रमाला अंबाजोगाई शहरातील नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला. यामध्ये जेष्ठ नागरिक व महिलांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग हे या उपक्रमाचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल. या उपक्रमाची सुरूवात नगरपरिषद येथून योगेश्वरी महाविद्यालय व तेथून परत नगरपरिषद अशी करण्यात आली .

अंबाजोगाई पिपल्स को-ऑप बँकेच्या वतीने रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त विविध प्रकारच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. अश्याच विविध कार्यक्रमातील एक पुष्प म्हणून नागरिकांच्या आरोग्यासाठी ‘चला सोबत चालू या’ हा उपक्रम सकाळी 6 वाजता आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात अंबाजोगाई पंचक्रोशीतील युवक, जेष्ठ नागरिक, महिला तसेच शहरातील विविध सामाजिक संघटनांचा सहभाग होता. 

‘चला सोबत चालू या’ या उपक्रमास बँकेचे संस्थापक अध्यक्ष राजकिशोर मोदी, डॉ. सुरेंद्र खेडगीकर, अंजली चरखा, रोहिणी पाठक तसेच बँकेचे उपाध्यक्ष प्रकाश सोळंकी, प्रा. वसंत चव्हाण, चंद्रशेखर वडमारे, जमील भाई यांनी हिरवा झेंडा दाखवून प्रारंभ केला. यावेळी डॉ. सुरेंद्र खेडगीकर यांनी अंबाजोगाई पिपल्स को-ऑप बँक व राजकिशोर मोदी यांनी सुरू केलेल्या उपक्रमाचे अभिनंदन केले. तसेच अंबाजोगाई पिपल्स बँक ही खरोखरच पिपल्स बँक आहे हे दाखवून दिले, असे गौरवोद्गार काढले. नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन डॉ खेडगीकर यांनी केले .

उपक्रमाप्रसंगी राजकिशोर मोदी यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले. प्रत्येक व्यक्तीने आपल्या स्वतःच्या आरोग्यासाठी दररोज सकाळी किमान अर्धा तास द्यावा, असे आवाहन उपस्थित जनसमुदयास केले. आपण स्वतः गेली 35 वर्ष सकाळी मॉर्निंग वॉक करत व्यायाम व योगा करतो आहे. व्यायामामुळे शारीरिक व्याधी जवळ येत नाहीत, तसेच कुठले औषध किंवा गोळी घेण्याची गरज भासत नाही. तेव्हा नागरिकांनी दररोज सकाळी व्यायामाची सवय लावावी, असे आवाहन केले. ‘चला सोबत चालू या’ या उपक्रमात बँकेचे सर्व संचालक मंडळ, राजकीय, सामाजिक, पत्रकारिता क्षेत्रातील मान्यवर सहभागी झाले होते.