ओबीसी आरक्षण : जनगणनेत समावेश नाही तर जनगणनेत सहभाग नाही, ‘पाटी लावा’ आंदोलनास उत्स्फूर्त प्रतिसाद

अंबाजोगाई : अखिल भारतीय ओबीसी परीषदेच्या वतीने 28 व 29 मे रोजी राबविण्यात येणाऱ्या ‘पाटी लावा’ आंदोलनास आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील नामफलकाला हार घालून प्रारंभ करण्यात आला. हे आंदोलन दोन दिवस चालणार असून आज या आंदोलनास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

अखिल भारतीय ओबीसी परीषदेच्या नेत्या अ‍ॅड. अंजली साळवे यांच्या प्रेरणेने तालुकाध्यक्ष अ‍ॅड. किशोर गिरवलकर व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत या ‘पाटी लावा’ आंदोलनाला सुरुवात करण्यात आली.

केंद्र आणि राज्य शासनाची ओबीसी आरक्षण संदर्भात टोलवाटोलवी सुरु असतांनाच ओबीसी जनगणनेकडे केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी 28 व 29 मे रोजी अखिल भारतीय ओबीसी परीषदेच्या वतीने अंबाजोगाई शहरात ‘पाटी लावा’ आंदोलनाची सुरुवात करण्यात आली.

या संदर्भात अधिक माहिती देताना अ‍ॅड. किशोर गिरवलकर यांनी पुढे असे म्हटले आहे की, केंद्र आणि राज्य पातळीवर ओबीसी आरक्षणाची केवळ टोलवाटोलवी शुरू आहे. सध्या ओबीसींचे राजकीय आरक्षण तर धोक्यात आहेच. त्याचबरोबर शैक्षणिक आणि नोकऱ्यांमधील आरक्षणसुद्धा अशीच काही तरी ( एम्पिरिकल डेटा सारखी) पळवाट काढून तेही स्थगित केले जाऊ शकते, तरीही भारतीय समाजातील बहुसंख्य असणारा ओबीसी अजगरी शांततेत आहे.

आता ही शांतता आपल्या पुर्वजांनी मिळवून दिलेले आरक्षण संपविल्याशिवाय राहणार नाही. या शांततेला छेद देण्यासाठी व केंद्र सरकारपर्यंत आपला आवाज पोहोचविण्यासाठी महाराष्ट्रात ठिकठिकाणी ओबीसींचे ‘पाटी लावा’ आंदोलन सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून अंबाजोगाईमध्ये सुद्धा अ‍ॅड. अंजली साळवे (नागपूर) यांच्या संकल्पनेतून ओबीसी बांधवांचे ‘पाटी लावा’ आंदोलनास दिनांक 28 व 29 मे 2022 रोजी सुरुवात करण्यात आली आहे.

‘जनगणनेत ओबीसी कॉलम नाही ; तर जनगणनेत आमचा सहभाग नाही’ अशा आशयाची ही पाटी ओबीसी बांधवांनी या आंदोलनात आपल्या दारावर लावली. ज्यामुळे ओबीसींवरील होऊ लागलेल्या घटनात्मक अन्यायाची ओबीसी बांधवांना जाणीव होईल तसेच त्यांचा या मोहिमेत प्रत्यक्ष सहभाग होईल. ओबीसीचे आरक्षण हा आपला हक्क आहे. आपल्या येणाऱ्या पिढ्यांचा हक्क आहे. या आंदोलनात शहरातील बहुसंख्य ओबीसी बांधवांनी आपल्या दारावर पाटी लावून सहभाग घेतला.

या आंदोलनात अ‍ॅड. किशोर गिरवलकर, दिनेश परदेशी, दिलीप सांगळे, भागवत मसणे, अ‍ॅड. इस्माईल गवळी, अ‍ॅड. संजय व्यवहारे, योगेश सुरवसे, राजेश, प्रा. दत्ता रामरुले, वेदपाठक, यांच्यासह अनेकांनी सहभाग घेतला.