उपप्रादेशिक परिवहन अधिकारी दत्तात्रय सांगोलकर यांनी दिली माहिती
अंबाजोगाई : अंबाजोगाई मधील खाजगी ट्रॅव्हल्स धारकांकडून पुणे प्रवासासाठी रुपये 1500 पेक्षा अधिक तर मुंबई प्रवासाठी रुपये 2000 हून अधिक प्रवास भाडे आकारुन प्रवाश्यांची आर्थिक लूट होत असल्याच्या तक्रारी कार्यालयास प्राप्त होत आहेत.
राज्यातील प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांकडून मोठ्या प्रमाणात खाजगी कंत्राटी वाहनांचा वापर करण्यात येतो. अश्या प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांकडून खाजगी कंत्राटी वाहतूकीची ने – आण करणाऱ्या वाहतूकदारांकडून गर्दीच्या हंगामामध्ये अवाजावी भाडेवाढ करण्यात येते. या पार्श्वभूमीवर मोठया प्रमाणात भाडेवाढ करुन प्रवाश्यांची आर्थिक पिळवणूक होऊ नये, या उद्देशाने शासनाने खाजगी कंत्राटी परवाना वाहनाचे कमाल भाडे निश्चित केलेले आहे.
अंबाजोगाई कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील खाजगी ट्रॅव्हल्सना सूचित करण्यात येते की, शासनाने विहीत केलेल्या कमाल भाडेदरापेक्षा अधिकचे भाडे प्रवाश्यांकडून आकारण्यात येऊ नये. सोबत अंबाजोगाई ते पुणे व अंबाजोगाई ते मुंबई प्रवासाकरिता निश्चित केलेल्या प्रवासी भाडेदराचा तक्ता जोडलेला आहे. या कमाल भाडेदरापेक्षा अधिक भाडे आकारण्यात आल्यास सदर ट्रॅव्हल्सच्या परवानाधारकाविरुध्द मोटार वाहन कायदा/नियमाप्रमाणे कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी.
तसेच खाजगी बस मालकांनी आपली वाहने ज्या ठिकाणाहून सुटतात त्या ठिकाणापासून आकारावयाचे महत्तम भाडे बाबतचा विहित नमुन्यात तक्ता तयार करुन व त्याप्रमाणे येणारा प्रती आसन दर दर्शवून सदर खाजगी कंत्राटी वाहने ज्या ठिकाणाहून सुटतात त्या ठिकाणी प्रसिध्द करण्यात यावा.
उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, अंबाजोगाई या कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातून पुणे, मुंबई आदी ठिकाणी जाणाऱ्या खाजगी बसेस जास्तीचे भाडे वसुली केले जात असल्यास कार्यालयाच्या mh44@mahatranscom.in या ईमेल आयडीवर प्रवाश्यांनी तक्रार नोंदवावी, जेणेकरुन सदरील खाजगी बसेसवर मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल, अशी माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी दत्तात्रय सांगोलकर यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.