एकही पात्र लाभार्थी वंचित राहू नये, यासाठी विशेष यंत्रणा राबविण्याचे धनंजय मुंडेंचे प्रशासनाला निर्देश
अंबाजोगाई : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या माध्यमातून मला निराधार, दिव्यांग, विधवा, परित्यक्त्या यांसारख्या सामाजिक व आर्थिक दुर्बल घटकांची सेवा करायची संधी मिळाली. विशेष सहाय्य योजनांच्या माध्यमातून आर्थिक सहाय्य, अनुदान याद्वारे या निराधार व दुर्बल घटकांचे आयुष्य सुखकर करता यावे, यासारखा दुसरा आनंद कशातच नाही, प्रत्येक निराधाराला आधार देणे हे आमचे कर्तव्य आहे, असे मत सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी व्यक्त केले. अंबाजोगाई येथील आद्यकवी मुकुंदराज सांस्कृतिक सभागृहात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
मिशन वात्सल्य, संजय गांधी निराधारसह विविध विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थींना लाभ वितरण व संवाद मेळावा कार्यक्रम अंबाजोगाई शहरातील मुकुंदराज सभागृहात आयोजित करण्यात आला. यावेळी प्रशासकीय अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
महाराष्ट्रांमध्ये 46 लाख वेगवेगळ्या पाच योजनेच्या माध्यमांतून लाभार्थ्यांना सानुग्र अनुदान देण्यात येत आहे. आता 21 हजार रुपये उत्पन्न मर्यादा असल्याने त्यामध्ये आता वाढ केली पाहिजे, ही मागणी आमच्याकडे येत आहे. तर अनुदानात वाढ करण्याची देखील मागणी केली जात आहे. मात्र, हे करत असताना महाराष्ट्र हे सर्वात मोठं राज्य आहे आणि सध्या 46 लाख लाभार्थ्यांना लाभ देण्यात येतो आणि यांची जी मागणी आहे याचा महाविकास आघाडी सकारात्मक विचार करणार असल्याचे पुढे बोलताना मुंडे म्हणाले.
या कार्यक्रमात अंबाजोगाई तालुक्यातील मिशन वात्सल्य अंतर्गत लाभार्थींना लाभाचे धनादेश वितरण, संजय गांधी निराधार, श्रावण बाळ योजनेतून नव्याने लाभ मंजूर झालेल्या लाभार्थींना मंजुरी पत्र वितरण, राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेतील कुटुंबांना एकरकमी अर्थसहाय्य आदी लाभांचे वितरण ना. मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी आ. संजय दौंड, माजी आ. पृथ्वीराज साठे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड. राजेश्वर चव्हाण, राजकिशोर मोदी, बन्सी अण्णा सिरसाट, दत्ता आबा पाटील, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख, मानवलोक संस्थेचे कार्यवाह अनिकेत लोहिया, राष्ट्रवादी डॉक्टर सेलचे प्रदेशाध्यक्ष डॉ. नरेंद्र काळे, बबन भैय्या लोमटे, विधानसभा अध्यक्ष गोविंदराव देशमुख, विलासराव सोनवणे, शंकरराव उबाळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष ताराचंद शिंदे, ईश्वर शिंदे, मनोज लखेरा, तानाजी देशमुख यांसह संजय गांधी समितीचे अध्यक्ष सुधाकर माले, सर्व सदस्य, अप्पर जिल्हाधिकारी मनीषा मिसकर, तहसीलदार विपीन पाटील आदी उपस्थित होते.