परिवहन अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे पुणे – मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांची ट्रॅव्हल्सवाल्यांकडून आर्थिक लुट

पुणे प्रवासासाठी 1500 हुन अधिक तर मुबंई प्रवासासाठी 2000 हुन अधिक प्रवास भाडे

अंबाजोगाई : प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे पुणे – मुंबईकडे जाणाऱ्या ट्रॅव्हल्समध्ये प्रवास करण्यासाठी अंबाजोगाईमधील ट्रॅव्हल्सवाल्यांकडून पुणे प्रवासासाठी 1500 हुन अधिक तर मुंबई प्रवासासाठी 2000 हुन अधिक प्रवास भाडे आकारून प्रवाशांची आर्थिक लुट करत‌ असल्याने लवकरात लवकर परिवहन अधिकारी यांना एक शिष्ट मंडळ भेटून सर्व ट्रॅव्हल्स ऑफिसला दर पत्रक लावण्याचे निर्बंध घालावेत आणि याची कडक अंमलबजावणी करावी, अशी मागणी करणार आहेत.

मागील काही दिवसांपासून अंबाजोगाईसह नांदेड, परभणी येथुन येणाऱ्या व पुणे – मुबंईकडे जाणाऱ्या ट्रॅव्हल्सवाल्यांनी प्रवाशांची मोठ्या प्रमाणावर आर्थिक लुट सुरू केलेली असून यावर प्रादेशिक परिवहन अधिकारी (आरटीओ) यांचे काडीमात्रही लक्ष नाही.

अंबाजोगाई आगारातून पुण्याला जाण्यासाठी संध्याकाळी 9 वाजता अंबाजोगाई – वल्लभनगर ही एकमेव सीटर कम स्लीपरकोच बससेवा असुन एस. टी. महामंडळ पुणे- शिवाजीनगर जाण्यासाठी फक्त 669 रुपये तर वल्लभनगर जाण्यासाठी 705 रुपये प्रवासी भाडे आकारते. मात्र, अंबाजोगाई शहरातून जाणाऱ्या खाजगी ट्रॅव्हल्सवाल्यांवरती प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांचे तिळमात्र ही बंधन नसल्याने याचा पुरेपूर फायदा हे ट्रॅव्हलवाले घेऊन प्रवाशांची मोठ्या प्रमाणावर आर्थिक लुट करत आहेत.   

प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे पुणे – मुंबईकडे जाणाऱ्या ट्रॅव्हल्समध्ये प्रवास करण्यासाठी अंबाजोगाई मधील ट्रॅव्हल्सवाल्यांकडून पुणे प्रवासासाठी 1500 हुन अधिक तर मुबंई प्रवासासाठी 2000 हुन अधिक प्रवास भाडे आकारून प्रवाशांची मोठ्या प्रमाणावर आर्थिक लुट करण्यात येत आहे.    

पुणे – मुंबईकडे जाणाऱ्या नामांकीत कंपनीच्या काही ट्रॅव्हल्स प्रवाशांना दर्जेदार सेवा देतात, त्यामुळे त्यांचे प्रवासी भाडे दर हे पूर्वीपासून जास्त आहेत. मात्र, याच दरांचा फायदा घेत प्रवाशांना कुठल्याही सुविधा न देणाऱ्या, मोडखळीस आलेल्या ट्रॅव्हलसाठी सुद्धा हे ट्रॅव्हल्सवाले त्याच तुलनेत दर आकारणी करून प्रवाशांची आर्थिक लुट करत आहेत. मागील काही दिवसांपासून तर या महाशयांनी तर लुटीचा कहरच केलेला आहे. 

प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना भेटणार शिष्टमंडळ

कोरोना काळातही ही मंडळी अशीच लुट करू लागल्याने प्रादेशिक परिवहन अधिकारी, उपजिल्हाधिकारी यांना डॉ. राजेश इंगोलेसह काही नागरिकांनी निवेदन देऊन झालेल्या चर्चेअंती प्रवासी भाड्याचे दर प्रमाणित करून हे प्रत्येक ट्रॅव्हल्सच्या कार्यालयात लावावेत, असे ठरल्या गेले. याची अंमलबजावणी काही काळ झाली. मात्र, या मंडळींनी हे दरपत्रक काडून टाकून प्रवाशांची लूट सुरू केली आहे. त्यामुळे लवकरात लवकर प्रादेशिक परिवहन अधिकारी यांना एक शिष्टमंडळ भेटून सर्व ट्रॅव्हल्स ऑफिसला दर पत्रक लावण्याचे निर्बंध घालावेत आणि याची कडक अंमलबजावणी करावी, अशी मागणी करणार आहे.