आरक्षण : अंबाजोगाईत ओबीसी बांधव करणार ‘पाटी लावा’ आंदोलन

अंबाजोगाई : केंद्र आणि राज्य पातळीवर ओबीसी आरक्षणाची केवळ टोलवाटोलवी सुरू आहे, सध्या ओबींसीचे राजकीय आरक्षण तर धोक्यात आहेच. त्याचबरोबर शिक्षण आणि नोकऱ्यांमधील  आरक्षण सुद्धा अशीच काही तरी ( एम्पिरिकल डेटा सारखी ) पळवाट काढून तेही स्थगित केले जाऊ शकते. तरीही भारतीय समाजातील बहुसंख्य असणारा ओबीसी अजगरी शांततेत आहे.

मात्र, ही शांतता आपल्या पूर्वजांनी मिळवून दिलेले आरक्षण संपविल्याशिवाय राहणार नाही, या शांततेला छेद देण्यासाठी व केंद्र सरकारपर्यंत आपला आवाज पोहोचविण्यासाठी महाराष्ट्रात ठिकठिकाणी ओबीसींचे ‘पाटी लावा’ आंदोलन सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून अंबाजोगाईमध्ये सुद्धा अ‍ॅड. अंजली साळवे (नागपूर) यांच्या संकल्पनेतून व अ‍ॅड. किशोर गिरवलकर, यांच्या प्रेरणेतून ओबीसी बांधवांचे ‘पाटी लावा’ आंदोलन दिनांक 28 व 29 मे 2022 रोजी होणार आहे.

जनगणनेत ओबीसी कॉलम नाही ; तर जनगणनेत आमचा सहभाग नाही

अशा आशयाची ही पाटी ओबीसी बांधव आपल्या दारावर लावणार आहेत, ज्यामुळे ओबीसींवरील’ होऊ लागलेल्या घटनात्मक अन्यायाची ओबीसी बांधवांना जाणीव होईल तसेच त्यांचा या मोहिमेत प्रत्यक्ष सहभाग होईल.

ओबीसींचे आरक्षण हा आपला हक्क आहे. आपल्या येणाऱ्या पिढ्यांचा हक्क आहे. या आंदोलनात  बहूसंख्य ओबीसी बांधवांनी आपल्या घरावर पाटी लावून सहभागी व्हावे. असे आवाहन समस्त ओबीसी बांधवांच्या वतीने अ‍ॅड. किशोर गिरवलकर, अ‍ॅड. इस्माईल गवळी, अ‍ॅड. संजय व्यवहारे, प्रा. दत्ता रामरुले यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे केले आहे.