अंबाजोगाई : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याबद्दल आक्षेपार्ह मजकूर फेसबुकवर पोस्ट केल्याबद्दल केतकी चितळेंवर संपूर्ण राज्यभरातून टीकेचा भडीमार होत आहे. राज्यात काही ठिकाणी चितळेंवर गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. अंबाजोगाईतही या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली असून शहर पोलिस ठाण्यात केतकी चितळेंवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष ताराचंद शिंदे यांच्या फिर्यादीवरून शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. केतकी चितळें सध्या तुरुंगात असून तिला 18 मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. केतकी चितळेंवर राज्यभरात गुन्हा दाखल होण्याचे सत्र सुरूच आहे.
उपजिल्हाधिकारी यांना दिले होते निवेदन
राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल आक्षेपार्ह मजकूर फेसबुकवर पोस्ट केल्याबद्दल केतकी चितळेंवर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आज दिनांक 17 मे ला उपजिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे केली होती. यावेळी बीड जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण, माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी, तालुकाध्यक्ष ताराचंद शिंदे, तानाजी देशमुख, भिमसेन लोमटे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.