अंबाजोगाई : 2566 व्या बुद्ध जयंतीच्या निमित्ताने संघर्षभूमीवर विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. धम्मध्वजाचे रोहण, पुष्प अभिवादन, सामुहीक वंदना, 22 प्रतिज्ञा ग्रहण व विविध नगरांतून आलेल्या रॅलींची सांगता सकाळी संपन्न झाली. याप्रसंगी अंबाजोगाईकरांनी मोठ्या उत्साहात संघर्षभूमीवर तथागत बुद्धांना अभिवादन केले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस सम्राट अशोकनगर रॅली संयोजक व जयभीमनगर वाहन रॅली संयोजक या दोन्हींच्या प्रमुखांच्या हस्ते तथागत बुद्धांच्या पुतळ्यास पुष्प अर्पण करण्यात आली. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. नंतर द्रुपदाआई सरवदे यांच्या हस्ते पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी प्रा. किर्तीराज लोणारे यांनी सामुहीक त्रिसरण पंचशील घेतले. संविधान थोरात याने सर्वांना 22 प्रतिज्ञा दिल्या. नंतर उपस्थितांनी महामानवांच्या नावांचा जयघोष करत पुष्पवर्षाव केला.
याप्रसंगी गायक बळीराम उपाडे यांनी ‘प्रथम नमो गौतमा चला हो प्रथम नमो गौतमा’ हे गीत अत्यंत उत्तमरित्या सादर केले. शेवटी दैवशीला राजू वडमारे – पुणे, पंचशीला शिंदे – बीड व प्रा. अनंत कांबळे मित्रमंडळ अंबाजोगाई यांच्या वतीने खिरदान करण्यात आले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन, प्रास्ताविक ॲड. संदीप थोरात यांनी केले तर संजय हतागळे यांनी उपस्थितांचे आभार मानले. विविध नगरांतील बंधु – भगीनी या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
या अभिवादन कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ॲड. शाम तांगडे, गुलाबराव गायकवाड, खंडेराव जाधव गुरुजी, प्रा. डॉ. गणेश सुर्यवंशी, डॉ. बबनराव मस्के, अनंत सरवदे, बबनराव ठोके, विश्वनाथ सावंत, मुरलीधर कांबळे, किरण वाघमारे, डॉ. मधुकर खळगे, शिंदे, बाबुराव बनसोडे, धम्मपाल सरवदे जाईआई हिरवे, मंगल जोगदंड, राधा मस्के आदींनी प्रयत्न केले. सरणतंय गाथेने कार्यक्रमाची सांगता झाली