अंबाजोगाई तालुक्यातील 6 जिल्हा परिषद गट, 12 पंचायत समिती गणांची निवडणूक लढविणार – आमदार विनायक मेटे

नगरपरिषद निवडणुकीत जेवढे शक्य आहे तेवढे उमेदवार देण्याचा प्रयत्न

अंबाजोगाई : अंबाजोगाई तालुक्यातील 6 जिल्हा परिषद गट, 12 पंचायत समिती गणांची निवडणूक पुर्ण ताकदीने लढविणार आहोत. नगरपरिषद निवडणुकीत मात्र जेवढे शक्य आहे तेवढे उमेदवार देण्याचा प्रयत्न राहणार आहे, अशी माहिती शिवसंग्राम संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आमदार विनायक मेटे यांनी दिली. शासकीय विश्रामगृहात आज दिनांक 16 मे ला आयोजित पत्रकार परिषदेत मेटे बोलत होते.

अंबाजोगाई येथे शिवसंग्राम संघटनेच्या तालुका पदाधिकाऱ्यांची, कार्यकर्त्यांची बैठक आज पार पडली. त्या पार्श्वभूमीवर आमदार विनायक मेटे यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

यावेळी बोलताना आमदार विनायक मेटे म्हणाले की, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकी संदर्भात पदाधिकाऱ्यांशी, कार्यकर्त्यांशी चर्चा झाली. अंबाजोगाई तालुक्यातील जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणात मी स्वतः दौरा करून तयारी करणार असून ही निवडणुक जिंकण्यासाठी प्रयत्न करणार आहोत.  

मेटे बोलताना पुढे म्हणाले की, बीड जिल्ह्यात अतिरिक्त उसाचा प्रश्न गंभीर बनला आहे. शेतकरी आत्महत्या करित आहेत. यावर ठाकरे सरकार गंभीर नसून शेतकऱ्यांचे त्यांना काहीही देणेघेणे नाही. आम्ही मागणी केली होती की, विलासराव देशमुख यांच्या सरकारच्या काळात असाच अतिरिक्त ऊसाचा प्रश्र्न निर्माण झाला होता, त्यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना 50 हजार हेक्टरी मदत केली होती. आज परिस्थिती बदलली आहे. शेतकऱ्यांना हेक्टरी 1 लाख रुपये मदत देण्याची गरज आहे, पण ठाकरे सरकार याकडे दुर्लक्ष करित आहे.

ओबीसी आरक्षण हे सरकारच्या नाकर्तेपणाच्या भुमिकेमुळे गेले आहे. राज्य सरकारने सुप्रीम कोर्टात योग्य भूमिका मांडली नाही, ओबीसी आरक्षणासाठी कायदा केला पण तो टिकला नाही. आम्ही हा कायदा टिकणार नाही, असं सांगत होतो. पण ओबीसींच्या मतांच्या राजकारणासाठी सरकारने त्यांची दिशाभूल केली. ओबीसींना भडकून स्वत: च्या चुका झाकण्याचा प्रयत्न सरकार करत आहे. मराठा आरक्षण असोकी मागासवर्गीयांचे पदोन्नतीमधील आरक्षण, सर्व ठिकाणी सरकारचा नाकर्तेपणा दिसून येत आहे. ठाकरे सरकार कोणत्याही समाजाला न्याय देऊ शकत नाही, असेही मेटे म्हणाले.

छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक समुद्रात उभा करण्यासाठी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाठपुरावा करत आवश्यक त्या सर्व परवानग्या केंद्र सरकारकडून मिळवून दिल्या आणि त्याचे कामही‌ सुरु झालं. परंतू सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिल्याने ते काम गेल्या अडीच वर्षांपासून बंद आहे. उध्दव ठाकरे शिवाजी महाराजांचे नाव घेऊन राजकारण करतात, पण अडीच वर्षांत अडीच मिनीटेही स्मारकासाठी बैठक घेतली नाही आणि चर्चाही केली नाही, अशी टीका मेटे यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्यावर केली.

दोन दिवसांपूर्वी मुंबईत मुख्यमंत्र्यांची सभा झाली, यात मुख्यमंत्र्यांचं भाषणं होतं की कोणतं पोरगं भाषण करत होतं हेच कळाले नाही. महाराष्ट्राचं पुढचं व्हीजन नाही, विकासाचे मुद्दे नाहीत, ‘उध्दवा अजब तुझे सरकार’ म्हणत अशा सरकारकडून काय अपेक्षा ठेवाव्यात, शेतकऱ्यांच्या मदतीसाठी आता शिवसंग्रामचं धावून जाणार आहे, असंही पत्रकार परिषदेत मेटे म्हणाले. पत्रकार परिषदेत मेटे यांनी देवस्थानच्या जमिनीबाबत, महागाई, भोग्यांचं राजकारण यासह अनेक विषयांवर भाष्य केले.

पत्रकार परिषदेला शिवसंग्रामचे जिल्हाध्यक्ष नारायणराव काशिद, नूतन तालुकाध्यक्ष धनुष गोरे, युवक शहराध्यक्ष ऋषिकेश लोमटे, सुनिल अरसुळ यांच्यासह पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.