भव्य धम्म चेतना रॅलीने आनंदमयी वातावरण
अंबाजोगाई : विश्वाला शांतीचा, समतेचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या 2566 व्या जयंती निमित्त आज दिनांक 16 मे ला शहर धम्म चेतना रॅलीने बहरून आले. संपूर्ण विश्वाला शांतीचा संदेश देणारे भगवान गौतम बुद्ध यांच्या जयंती निमित्त भारतीय बौद्ध महासभा, शाखा अंबाजोगाईच्या वतीने या भव्य धम्म चेतना रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
या रॅलीमध्ये शहरातील बहुसंख्य बौद्ध उपासक – उपासिका, बालके सहित भन्ते बी. धम्मसेन बोधी यांचा भिक्कु – श्रामनेर संघ उपस्थित होता. धम्म चेतना रॅलीला कास्ट्राईब संघटनेच्या वतीने फलहार वाटप करण्यात आले. धम्म चेतना रॅली भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथुन निघुन समारोप संघर्षभूमी येथे करण्यात आला.
यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा पूर्वचे अध्यक्ष श्रीराम मोरे यांच्या हस्ते व विभागीय सचिव के. आर. पडवळ यांच्या उपस्थितीत पंचशील ध्वजाचे ध्वजारोहन करण्यात आले. बुद्ध जयंती निमित्त आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तालुक्याचे संस्कार उपाध्यक्ष दिलीप वाघचौरे होते.
यावेळी धम्म मंचावर विभागीय सचिव के. आर. पडवळ, जिल्हाध्यक्ष श्रीराम मोरे, कोषाध्यक्ष संभाजी सोनवणे, जिल्हा कार्यकारिणीतील माधव काळे, प्रा. श्रीपती वाघमारे, एन. बी. राजभोज, सुधाताई जोगदंड उपस्थित होत्या. बीड जिल्हा पूर्वचे सरचिटणीस बाबासाहेब धन्वे यांनी 22 प्रतिज्ञाचे वाचन करून भन्ते बी. धम्मसेन यांच्या उपस्थितीत उपस्थितांना धम्म दीक्षा देण्यात आली. यावेळी दहा दिवसीय बौद्धांचार्य – श्रामनेर संघाचे मनोगत ऐकण्यात आले.
भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष श्रीराम मोरे यांनी उपस्थित उपासकांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, धम्म प्रसार प्रचारांमध्ये गती येणे महत्वाचे आहे. उपस्थित उपासकांनी भारतीय बौद्ध महासभेला सहकार्य करावे, कारण धम्म प्रचार प्रसारांमध्ये भारतीय बौद्ध महासभा संपूर्ण विश्वामध्ये नंबर एकवर आहे. यावेळी विभागीय सचिव के. आर. पडवळ म्हणाले की, आपण दीक्षा घेऊन 66 वर्ष झाली तरी आपण बुद्ध झालेलो नाहीत.
पूज्यभन्ते धम्मसेन बोधी यांनी सर्वांना धम्मदेसना दिली. ते म्हणाले की, ज्या – ज्या देशांनी बुद्ध नाकाराला त्यांचा विकास खुंटलेला असतो. बुद्ध धम्म जीवनाला वळण लावतो, जीवनाचा विकास करतो. बौद्ध धम्म हा वैज्ञानिक आहे, आचारण शिलतेवर आधारित आहे.
बुद्ध जयंतीच्या या कार्यक्रमासाठी तालुका संस्कार उपाध्यक्ष दिलीप वाघचौरे, शहराध्यक्षा भावना कांबळे, देविदास घोबाळे, रुखमाजी जोगदंड, कासारे, शहराच्या सचिव जयश्री गावडे, संजीवनी धन्वे, तरकसे यांच्यासह शिबिरास राजकिशोर मोदी, संतोष शिनगारे, अतुल कसबे यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सरचिटणीस बाबासाहेब धन्वे यांनी केले तर आभार तालुक्याचे कोषाध्यक्ष देविदास घोबाळे यांनी मानले.