जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभुराजे या घोषणांनी शहर दुमदुमले
अंबाजोगाई : येथील शिवपुत्र छत्रपती संभाजीराजे सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीने काढण्यात आलेल्या आकर्षक मिरवणुकीने अंबाजोगाईकरांचे लक्ष वेधले. शहरात मागील सहा वर्षांपासुन छत्रपती संभाजीराजे यांच्या जयंतीनिमित्त विविध उपक्रम आयोजित करण्यात येतात. जयंती उत्सवाचे हे सातवे वर्ष आहे.
प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षी भव्यदिव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. शिवपुत्र संभाजीराजे सार्वजनिक जयंती उत्सवानिमित्त येथील गणेश कदम युवा मंचच्या वतीने महाराष्ट्रातील पारंपारीक लोककलांचा मिरवणुकीत समावेश करून अंबाजोगाईकरांचे लक्ष वेधले. जयंती उत्सवाला उद्घाटक म्हणून माजी नगराध्यक्ष राजकिशोर पापा मोदी तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी जि. प. सदस्य शंकरअण्णा उबाळे, माजी उपसभापती तानाजी देशमुख हे होते. यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून डिघोळचे सरपंच बाळासाहेब सोनवणे, माजी नगरसेवक दिलीप काळे, संजय गंभीरे, गणेश मसने, सामाजिक कार्यकर्ते सुनिल व्यवहारे, सुनिल वाघाळकर, गणेश कदम आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
प्रारंभी संभाजी महाराज यांच्या प्रतिमेस व भव्य पुतळ्यास मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर युवामंचच्या वतीने सर्व मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शरद शिंदे यांनी केले तर उपस्थितांचे आभार उत्सव समितीचे उपाध्यक्ष सचिन तौर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी गणेश कदम युवामंचच्या पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला.
संभाजीराजेची आकर्षक मूर्ती : भव्यदिव्य मिरवणुक
शिवपुत्र संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त उत्सव समितीच्या वतीने अंबाजोगाई शहरातून भव्यदिव्य मिरवणुक काढली. बैलगाडीत बसलेली शंभुराजेंची मूर्ती, आकर्षक विद्युत रोषणाई, मिरवणुकीत महिला आणि पुरुषांचे शिवतांडव, ढोल – ताशा पथक – कर्जत (रायगड), रेणुका माता संबळ वाद्यपथक – सातारा येथील पथकाचे सशस्त्र मर्दानी खेळ, हलगी पथक – परळी, ढोलपथक सहभागी झाले. घोड्यावर बसलेले मावळ्यांच्या वेशभूषेतील लहान बालक सर्वांचे लक्ष वेधून घेत होते.
ही मिरवणुक शहरातील पाटील चौक – बस स्टँड – शिवाजी महाराज चौक - गुरूवार पेठ – मंडी बाजार या मार्गे काढण्यात येवून भटगल्ली येथे मिरवणुकीचा समारोप झाला. या मिरवणुकीत हजारोंचा जनसमुदाय सहभागी झाला होता. फटाक्यांची आतिषबाजी, ‘जय जिजाऊ ,जय शिवराय’, ‘जय शंभुराजे’ या घोषणांनी अंबाजोगाई शहर दुमदुमले.