मुंबई : राज्यातील 216 नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारूप प्रभाग रचनेवर 10 ते 14 मे 2022 या कालावधीत हरकती आणि सूचना दाखल करता येतील, असे राज्य निवडणूक आयोगाकडून शुक्रवारी जाहीर करण्यात आले. सुनावणीनंतर अंतिम प्रभाग रचना 7 जून 2022 पर्यंत प्रसिद्ध करण्यात येईल, असेही आयोगाने स्पष्ट केले आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची कार्यवाही 10 मार्च 2022 रोजी असलेल्या टप्प्यांपासून पुढे सुरू करावी, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. त्यानुसार राज्य निवडणूक आयोगाने ही कार्यवाही सुरू केली आहे. यात 208 नगरपरिषदा आणि 8 नगरपंचायतींचा समावेश आहे.
त्यांच्या प्रारूप प्रभाग रचनेवर 10 ते 14 मे 2022 या कालावधीत हरकती आणि सूचना दाखल करता येतील. त्यावर जिल्हाधिकारी 23 मे 2022 पर्यंत सुनावणी देतील. प्रभाग रचनेचे प्रारूप 10 मार्च 2022 रोजीच प्रसिद्ध करण्यात आले होते. त्यावेळी प्राप्त झालेल्या आणि आता नव्याने प्राप्त होणाऱ्या हरकती, सूचनांवर एकत्रित ही सुनावणी देण्यात येईल, अशी माहिती आयोगाने दिली आहे.