अंबाजोगाई पंचायत समिती परिसरात सोनबा येवले पाणपोईचे लोकार्पण

अंबाजोगाई : लोकजागर बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, पाटोदा (म.) यांच्या वतीने महात्मा बसवेश्वर जयंती व राजश्री शाहू महाराज स्मृती शताब्दी वर्षानिमित्त पंचायत समिती परिसरात जनतेसाठी सोनबा येवले पाणपोईचे लोकार्पण मान्यवरांच्या उपस्थित करण्यात आले.

अंबाजोगाई शहरात सध्या उन्हाची तीव्रता अधिक जाणवू लागली आहे. अशात सहाजिकच प्रत्येकाला पाण्याची तहान लागल्याशिवाय रहात नाही. पंचायत समितीत दररोज शेकडो ग्रामस्थं कामानिमित्त येत असतात. त्यातील बहुतांश ग्रामस्थं हे गरिब असतात. त्यांना पाण्याची बॉटल विकत घेऊन तहान भागवणं शक्य होत नाही. अशा ग्रामस्थांच्या पैशाची बचत व्हावी आणि थंड पाण्याने त्यांची तहानही भागवावी, या उदात्त हेतूने लोकजागर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे धिमंत राष्ट्रपाल आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मिळून पंचायत समिती परिसरात सोनबा येवले पाणपोई सुरू केली आहे. या पाणपोईचे लोकार्पण मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.

या कार्यक्रमासाठी प्रसिद्ध हृदय रोग तज्ञ डॉ. नवनाथ घुगे, गटविकास अधिकारी डॉ. संदीप घोणसीकर, पत्रकार अ. र. पटेल, पत्रकार महादेव गोरे यांच्यास मान्यवरांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या प्रारंभी महात्मा बसवेश्वर, लोकराजे‌ राजश्री शाहू महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून मान्यवरांच्या हस्ते अभिवादन करण्यात आले.

पाणपोईच्या लोकार्पण प्रसंगी डॉ. नवनाथ घुगे आणि डॉ. संदीप घोणसीकर यांनी लोकजागर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या उपक्रमाचे कौतुक करत सामाजिक उपक्रमांसाठी सहकार्य करण्याची भूमिका विषद केली.

लोकजागर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने सामाजिक आणि जनतेच्या प्रश्नांसाठी संघर्ष करणाऱ्या कार्यकर्त्यांचा यावेळी सन्मान करण्यात आला. यात वंचित बहुजन आघाडीचे अक्षय भुंबे, अमोल हतागळे, अमोल शिंदे, हनुमंत गायकवाड, विलास वाघमारे, मारूती माने, बप्पा काळे, दशरथ सोनवणे, विनोद शिंदे, बालू‌ कातकाडे यांच्यासह आदींचा समावेश होता.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लोकजागर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे धिमंत राष्ट्रपाल यांनी केले तर उपस्थितांचे आभार विलास वाघमारे यांनी मानले. कार्यक्रमासाठी पंचायत समिती परिसरातील जनतेची उपस्थिती होती.