‘स्वाराती’ चा होतोय कायापालट : आमदार संजय दौंड यांनीही केला होता पाठपुरावा
अंबाजोगाई : गोरगरिब रुग्णांसाठी वरदान ठरलेल्या ‘स्वाराती’ रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयाचा कायापालट करण्यासाठी बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी एकाच दिवशी तब्बल 26 कोटी 11 लाख रुपयांचा निधी खेचून आणला आहे. या निधीतून नवीन वार्ड, ऑपरेशन थिएटर आणि वीज संचाची नव्याने मांडणी होणार आहे.
स्वामी रामानंद तीर्थ हे बीड जिल्ह्यातील एकमेव शासकीय वैद्यकीय महाविद्यालय असून, येथील रुग्णालयात आरोग्यविषयक सर्व सुविधा उपलब्ध असाव्यात, कोणत्याही प्रकारच्या आजारावर इथे उपचार मिळावेत, यासाठी आवश्यक यंत्रसामग्री व तज्ञ डॉक्टर्स इथेच उपलब्ध व्हावेत, यासाठी पालकमंत्री तथा रुग्णालयाच्या अभ्यागत मंडळाचे अध्यक्ष धनंजय मुंडे, आ. संजय दौंड हे सातत्याने प्रयत्नशील असतात.
‘स्वाराती’ मध्ये 3.0 टेसला एमआरआय ही अत्याधुनिक मशीन तसेच अन्य विविध सामग्री धनंजय मुंडे यांनी याआधी रुग्णालय प्रशासनास उपलब्ध करून दिली आहे.
काल निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयाप्रमाणे रुग्णालयात नव्याने बांधण्यात आलेल्या 230 खाटांच्या इमारतीमध्ये वरती एक मजल्याचे बांधकाम करण्यात येणार असून तेथे आणखी 6 वॉर्ड, 4 ऑपरेशन थिएटर तसेच 4 विभाग उभारण्यात येणार आहेत, यासाठी 14 कोटी 99 लाख 39 हजार रुपये खर्चास वैद्यकीय शिक्षण मंत्रालयाने प्रशासकीय मान्यता प्रदान केली आहे. तसेच रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय इमारतीतील 14 वीज संच मांडणीसाठीही वैद्यकीय शिक्षण विभागाने 11 कोटी 21 लाख 22 हजार रुपये खर्चास प्रशासकीय मान्यता दिली. दरम्यान प्राप्त निधीमुळे येथील वीज संचांचे पुनरुज्जीवन होणार आहे.
‘स्वाराती’ रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयासाठी 26 कोटी 11 लाख 22 हजार रुपये निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांचे ना. धनंजय मुंडे व आ. संजय दौंड यांनी आभार मानले आहेत.