आ. संजय दौंड यांचाही पाठपुरावा
मुंबई : बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय येथील रुग्ण सुविधेसंदर्भात दिलेला शब्द पूर्ण केला असून, रुग्णालयातील 230 खाटांच्या नव्याने बांधण्यात आलेल्या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर बांधकाम करून आणखी काही वॉर्ड व सुविधा निर्माण करण्यासाठी 15 कोटी रुपये खर्चास वैद्यकीय शिक्षण विभागाने प्रशासकीय मान्यता दिली आहे. या बाबतचा शासन निर्णय वैद्यकीय शिक्षण विभागाने जारी केला आहे.
स्वामी रामानंद तीर्थ हे बीड जिल्ह्यातील एकमेव शासकीय वैद्यकीय महाविद्यालय असून, येथील रुग्णालयात आरोग्यविषयक सर्व सुविधा उपलब्ध असाव्यात, कोणत्याही प्रकारच्या आजारावर इथे उपचार मिळावेत, यासाठी आवश्यक यंत्रसामग्री व तज्ञ डॉक्टर्स इथेच उपलब्ध व्हावेत, यासाठी पालकमंत्री तथा रुग्णालयाच्या अभ्यागत मंडळाचे अध्यक्ष धनंजय मुंडे, आ. संजय दौंड हे सातत्याने प्रयत्नशील असतात. ‘स्वाराती’ मध्ये 3.0 टेसला एमआरआय ही अत्याधुनिक मशीन तसेच अन्य विविध सामग्री धनंजय मुंडे यांनी याआधी रुग्णालय प्रशासनास उपलब्ध करून दिली आहे.
आज निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयाप्रमाणे रुग्णालयात नव्याने बांधण्यात आलेल्या 230 खाटांच्या इमारतीमध्ये वरती एक मजल्याचे बांधकाम करण्यात येणार असून तेथे आणखी 6 वॉर्ड, 4 ऑपरेशन थिएटर तसेच 4 विभाग उभारण्यात येणार आहेत, यासाठी 14 कोटी 99 लाख 39 हजार रुपये खर्चास वैद्यकीय शिक्षण मंत्रालयाने प्रशासकीय मान्यता प्रदान केली असून, याबद्दल वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाचे मंत्री अमित देशमुख यांचे धनंजय मुंडे, आ. संजय दौंड यांनी आभार मानले आहेत.