मुंबई : बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन यांचा ‘झुंड’ हा चित्रपट चांगलाच चर्चेत राहिला आहे. हा चित्रपट चित्रपटगृहात पाहिल्यानंतर प्रेक्षक त्याची ‘ओटीटी’ प्लॅटफॉर्मवर येण्याची प्रतिक्षा करत होते. आता हा चित्रपट ‘ओटीटी’ प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. तेलंगणा उच्च न्यायालयाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. हा चित्रपट आता ‘ओटीटी’ वर आज 6 मे रोजी प्रदर्शित होणार आहे.
‘झुंड’ चित्रपटाच्या निर्मात्यांवर कॉपीराइटचा आरोप होता, त्यानंतर तेलंगणा उच्च न्यायालयाने अलीकडेच 6 मे रोजी ‘ओटीटी’ वर चित्रपट प्रदर्शित करण्यास बंदी घातली. यानंतर चित्रपटाच्या निर्मात्यांनी उच्च न्यायालयाच्या आदेशाविरोधात सर्वोच्च न्यायालयात अर्ज दाखल केला. त्यावर सुनावणी करत सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाच्या आदेशाला स्थगिती देत चित्रपटाच्या ‘ओटीटी’ रिलीजचे आदेश जारी केले.
यामुळे आता अमिताभ बच्चन यांच्या ‘झुंड’ चित्रपटाच्या ‘ओटीटी’ रिलीजला हिरवा झेंडा मिळाला आहे. आता हा चित्रपट आज 6 मे रोजी ‘ओटीटी’ प्लॅटफॉर्म झी 5 वर प्रदर्शित होणार आहे. ‘झुंड’ हा चित्रपट 4 मार्च रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला प्रेक्षक आणि समीक्षकांकडून चांगलीच पसंती मिळाली होती.
दरम्यान, ‘झुंड’ हा चित्रपट स्लमसॉकरचे संस्थापक विजय बरसे यांच्या आयुष्यावर आधारित आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन नागराज मंजुळे यांनी केले आहे. अमिताभ यांच्याशिवाय आकाश ठोसर आणि रिंकू राजगुरु हे या चित्रपटात दिसले आहेत.