मुंबई : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्याव्याच लागणार आहेत, हे सुप्रीम कोर्टाच्या आदेशामुळे स्पष्ट झालंय. त्यानंतर आता सर्व बाजुंनी तयारी सुरू झाली असून निवडणूकींच्या हालचालींना वेग आला आहे. 4 मे रोजी दोन आठवड्यांत निवडणुक कार्यक्रम जाहीर करण्याचे आदेश निवडणूक आयोगाला सुप्रीम कोर्टाने दिले आहेत.
त्यानुसार आता 20 मेपर्यंत कार्यक्रम जाहीर करावा लागणार आहे. 12 मे रोजी सुप्रीम कोर्ट महत्त्वाच्या सूचना करणार असून त्यानंतर कोणत्याही क्षणी आयोग कार्यक्रम जाहीर करेल. 2 टप्प्यांमध्ये ही प्रक्रिया होण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.
नगरपालिका, झेडपी निवडुणकीचं असं असू शकते वेळापत्रक ?
राज्यातील निवडणूकीचा पहिला टप्पा जुलै – ऑगस्टमध्ये होण्याची शक्यता असून या टप्प्यात महापालिका आणि नगरपालिका निवडणुका घेण्याचं नियोजन आहे. तर दुसरा टप्पा सप्टेंबर – ऑक्टोबरमध्ये असेल आणि त्यामध्ये जिल्हा परिषदा आणि पंचायत समितींसाठी मतदान होईल.
या निवडणुकीसाठी नवे गट आणि गणांची माहिती जिल्हा प्रशासनांनी आताच निवडणूक आयोगाला दिलीये. त्यामुळे त्यावर हरकती, सुनावणी आणि अंतिम रचना जाहीर होण्यास उशीर होणार आहे.
पहिला टप्पा शहरी आणि दुसरा टप्पा ग्रामीण असा कार्यक्रम असू शकतो. अशा पद्धतीनं 2 टप्प्यांत कार्यक्रम घेण्यामागे निवडणूक कर्मचारी आणि सुरक्षेचा विचार आहेच. मात्र मुंबई, पश्चिम महाराष्ट्र, कोकण अशा जास्त पाऊस पडणाऱ्या भागांचा वेगळा विचार आयोगाला करावा लागू शकतो.