पवार – मोदींची ग्रेट भेट : अंबाजोगाईतील विकासकामांवर झाली चर्चा

अंबाजोगाई : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची अंबाजोगाईचे माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी आज यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठाण, मुंबई येथे भेट घेतली. यावेळी पवार – मोदी यांच्यात अंबाजोगाई शहर व परिसराच्या विकासकामांवर आणि महत्वाच्या विषयावर सांगोपांग चर्चा झाली. 

राज्यात सध्या राजकीय व सामाजिक वातावरण दुषित करण्यात येत आहे. दोन समाजात तेढ निर्माण करण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. त्यावरही दोघांमध्ये चर्चा होऊन बीड जिल्हा व अंबाजोगाई परिसरात वातावरण दूषित न होऊ देण्याच्या सूचना देखील शरद पवार यांनी राजकिशोर मोदी यांना दिल्या. यावर मोदी यांनी तात्काळ आपण याकामी काळजी घेऊ, असे अभिवचन दिले.

राजकिशोर मोदी यांनी मागील अनेक वर्षांच्या काळात नगर परिषदेच्या माध्यमातून केलेल्या विविध विकासकामांबद्दल शरद पवारांनी समाधान व्यक्त केले. यापुढेही आपण विकासकामांच्या बाबतीत सदैव सोबत राहू, असा आशीर्वाद देखील पवारांनी राजकिशोर मोदी यांना दिला.

यावेळी राजकिशोर मोदी यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, साहेबांसोबत अंबाजोगाईच्या विविध विकासकामांवर चर्चा करतांना त्यांच्याशी झालेला प्रत्येक संवाद हा नेहमीच नवी प्रेरणा व नवी स्फूर्ती देणारा असा ठरला. अंबाजोगाईत करित असलेल्या विकासकामांचीही त्यांनी आवर्जून माहिती घेतली आणि पाठीवर शाबासकीची थाप दिली. त्यांनी केलेलं कौतुक वेगळेचं समाधान देणारे आहे, असे मोदी यांनी सांगितले. यावेळी राणा चव्हाण हे देखील उपस्थित होते.