एकात्मतेचा संदेश : माजी आमदार पृथ्वीराज साठे यांच्या इफ्तार पार्टीस उत्स्फूर्त प्रतिसाद

अंबाजोगाई : महाराष्ट्रातील राजकीय वातावरण हे मशिदीवरील भोंगे आणि हनुमान चालीसा या दोन विषयांमुळे तापले असून अशा काळातही हिंदू – मुस्लीम बांधव एकत्र येतात, हा ऐक्याचा आदर्श वस्तुपाठ घालून देणारा उपक्रम इफ्तार पार्टीच्या माध्यमातून माजी आमदार पृथ्वीराज साठे यांनी अंबाजोगाईत आयोजित करून गेल्या अनेक वर्षांपासूनची सुरू असलेली ही परंपरा यावर्षीही कायम ठेवली.

इफ्तार पार्टीचे आयोजन करून हिंदू – मुस्लिम ऐक्याची अंबाजोगाई शहराची आदर्श परंपरा माजी आमदार पृथ्वीराज साठे यांच्याकडून यावर्षीही जोपासण्यात आली. या इफ्तार पार्टीमधून मानवतेचा, सामाजिक सलोखा राखण्याचा संदेश देण्यात आला. सदरील उपक्रमातून सामाजिक सौहार्द जोपासण्याचे काम झाले. सध्या पवित्र रमजान महिना सुरू आहे. या काळात मुस्लिम बांधव मोठ्या प्रमाणात रोजे (उपवास) ठेवतात. ते संध्याकाळी इफ्तार करतात. 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे केज विधानसभा मतदारसंघाचे माजी आ. पृथ्वीराज साठे यांच्या वतीने मुस्लिम धर्मियांच्या अतिशय पवित्र समजल्या जाणाऱ्या रमजान महिना व या महिन्यात करण्यात येणाऱ्या उपवासाच्या पार्श्वभूमीवर मंगळवार, दिनांक 26 एप्रिलला येथील राजस्थानी मंगल कार्यालयात सर्व मुस्लिम – हिंदू बांधवांसाठी रोजा इफ्तारीचे आयोजन करण्यात आले होते. 

या इफ्तार पार्टीत माजी आ.पृथ्वीराज साठे, माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी, माजी उपनगराध्यक्ष बबनराव लोमटे, ‘स्वाराती’ चे अधिष्‍ठाता डॉ. भास्कर खैरे, माजी नगरसेवक मनोज लखेरा, माजी नगरसेवक डॉ. राजेश इंगोले, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष ताराचंद शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अलीमभाई, जिल्हा उपाध्यक्ष रऊफ भाई, जिल्हा उपाध्यक्ष मुनवरभाई, कार्याध्यक्ष बालाजी शेरेकर, युवा तालुकाध्यक्ष प्रमोद भोसले, दत्ताभाऊ सरवदे, हमीद चौधरी, सोमनाथ धोत्रे, भिमसेन लोमटे, अनिल पिंपळे, गणेश मसणे, प्रमोद गवळे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी, प्रमुख कार्यकर्ते, पत्रकार, प्रतिष्ठित नागरिक, असंख्य मुस्लिम बांधवांसह सर्व धर्मांतील नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला होता.