अंबाजोगाईच्या तहसीलदारांच्या गाडीला अपघात : एकजण गंभीर जखमी

अंबाजोगाई : केज – बीड महामार्गावर अंबाजोगाईच्या तहसीलदारांची शासकीय गाडी आणि एका मोटारसायकलीची धडक होऊन मोटार सायकलस्वार गंभीर जखमी झाला आहे. जखमीला अंबाजोगाई येथील ‘स्वाराती’ रुग्णालयात अधिक उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. 

या बाबत माहिती अशी की, दि. 23 एप्रिलला शनिवारी अंबाजोगाईचे नायब तहसीलदार मिलिंद गायकवाड हे औरंगाबाद येथील आयुक्त कार्यालयातील बैठक आटोपून अंबाजोगाईकडे येत असताना सायंकाळी 6:30 वा. केज – बीड महामार्गावर पदाश्री विठ्ठलराव पाटील सहकारी साखर कारखान्याजवळ शासकीय वाहन क्र. (एमएच 23/एफ 1515) आणि केजकडून मूकबधिर विद्यालयाच्या दिशेने जात असलेले कर्मचारी परशुराम सिरसाट (रा. फुले नगर, केज) यांची मोटारसायकल क्र. (एमएच 44/एए 3354) यांची समोरासमोर जोराची धडक झाली. 

या अपघातात परशुराम सिरसाट हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर केज येथील उपजिल्हा रुग्णालयात प्रथमोपचार करून त्यांना अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तिर्थ ग्रामीण रुग्णालयात हलविले आहे. 

दरम्यान, या अपघातात नायब तहसीलदार मिलिंद गायकवाड आणि गाडीचे वाहन चालक अंबुरे हे किरकोळ जखमी झाले. त्यांच्यावर केज येथील उपजिल्हा रुग्णालयात प्रथमोपचार करण्यात आले. अपघाताची माहिती मिळताच केज येथील नायब तहसीलदार सचिन देशपांडे हे तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी जखमींना मदत केली.