अंबाजोगाई – लातूर महामार्गावर मरण झालं स्वस्त : ट्रक – क्रुझरच्या भीषण अपघातात 8 ठार‌, 9 जखमी

रस्त्याच्या प्रश्नाकडे लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष

अंबाजोगाई : अंबाजोगाई – लातूर महामार्ग अरुंद रस्त्यामुळे आणि डिवायडर नसल्याने लोकांच्या जीवांवर उठला आहे. सायगाव जवळ ट्रक – क्रुझरच्या झालेल्या भीषण अपघातात 8 जण ठार झाले आहेत. हा अपघात आज दिनांक 23 एप्रिलला सकाळी 10 च्या सुमारास घडला आहे. अपघाताची तीव्रता इतकी भीषण होती की क्रुझर गाडी जाग्यावरच चूराडा झाली.

दरम्यान लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे अंबाजोगाई – लातूर महामार्गावर बीड हद्दीपासून माणसांचं मरण स्वस्त झालं आहे. लोकांचे जीव महत्त्वाचे असतील तर हा रस्ता रुंदीकरण करणे आणि डिवायडर बसविणे गरजेचे बनले आहे.

अंबाजोगाई तालुक्‍यातील राडी या गावांत एका कार्यक्रमासाठी लातूर जिल्ह्यातील साई आणि आर्वी येथून नातेवाईक क्रुझर गाडीतून निघाले होते. ते सायगाव जवळ असणाऱ्या नंदगोपाल डेअरीजवळ आले असता त्यांच्या क्रुझरला समोरून येणाऱ्या  ट्रकने जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात क्रुझरमधील 8 जण ठार झाले तर 9 जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये निर्मला सोमवंशी (38), स्वाती बोडके (35), शकुंतला सोमवंशी (38), सोजरबाई कदम (37), चित्रा शिंदे (35), खंडू रोहिले (35, चालक) कमल जाधव (30) आणि अनोळखी एकाचा समावेश आहे तर राजमती सोमवंशी (50), सोनाली सोमवंशी (25), रंजना माने (35), परिमला सोमवंशी (70), दत्तात्रय पवार (40), शिवाजी पवार (45), यश बोडके (9), श्रुतिका पवार (6), गुलाबराव सोमवंशी (50) आणि हे नऊ जण जखमी झाले आहेत. जखमीपैकी तिघांची प्रकृती चिंताजनक आहे. मृतात महिला आणि बालकांचा समावेश आहे. 

डिवायडर असते तर..

अंबाजोगाई – लातूर महामार्गावर सायगाव जवळ झालेला अपघात भीषण आहे. या महामार्गावर हा दुसरा भीषण अपघात आहे. लातूरपासून बीड जिल्ह्यातील हद्द सुरू झाल्यानंतर डिवायडर का होत नाहीत ? असा प्रश्न सर्वसामान्य जनता उपस्थित करत आहे. डिवायडर असते तर आजचा अपघात टाळता आला असता. माणसं मुंग्यासारखी मरत आहेत. लोकप्रतिनिधींनी यावर लक्ष देण्याची गरज आहे. जर अपघात यापुढे कमी करायचे असतील तर निश्चितच डिवायडर गरजेचे आहे, नाही तर ही वेळ कोणावरही आल्याशिवाय राहणार नाही.