सामाजिक सलोखा अबाधित राखण्यासाठी मुस्लीम तरुणांनी घेतला होता पुढाकार
अंबाजोगाई : राज्यात एकीकडे मशिदीवरील भोंगे व हनुमान चालीसावरून राजकीय वातावरण तापलेले असताना अंबाजोगाईतील मुस्लीम तरुणांनी सामाजिक सलोखा अबाधित राखण्यासाठी पुढाकार घेतला. या तरुणांच्या पुढाकाराने गुरुवारी (दि. 21) सायंकाळी अंबाजोगाईतील मरकस मस्जिदमध्ये आयोजित करण्यात आलेल्या इफ्तार पार्टीस सर्व मुस्लिमत्तर बांधवांनी हजेरी लावत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
राज्यात मशिदींवरील भोंगे व हनुमान चालीसावरून वातावरण चांगलेच तापले आहे. शहरी भागांसह ग्रामीण भागांतूनही यावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. राजकीय मंडळीदेखील यावर आरोप – प्रत्यारोप करून राजकीय पोळी भाजून घेण्याचे प्रयत्न करत असल्याचे चित्र आहे. मात्र, आजवर एकही धार्मिक दंगल न होऊ देता आपली वेगळी ओळख निर्माण केलेल्या अंबाजोगाईकरांनी याही वेळेस सामाजिक एकोपा जपला आहे.
शहरातील मुस्लीम तरुणांनी सामाजिक सलोखा जपण्याच्या हेतूने छत्रपती शिवाजी महाराज चौकाजवळ असलेल्या उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोरील मरकस मस्जिद येथे गुरुवारी सायंकाळी 6 वाजता मुस्लिमत्तर बांधवांसाठी विशेष इफ्तार पार्टीचे आयोजन केले.
भारतातील सर्व समाजातील बंधुभाव कायम राहावा, यासाठी आपल्या शहरापासून सुरुवात करावी, असा या मागचा उद्देश असल्याचे या तरुणांनी सांगितले. या पार्टीसाठी शहरातील सर्व समाजातील नागरिकांना आमंत्रित करण्यात आले होते. सामाजिक एकोपा जपण्यासाठी शहराच्या नावलौकिकाला साजेसा कौतुकास्पद उपक्रम आयोजित केल्याबद्दल या तरुणांच्या भूमिकेचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.