40 युवकांनी शिबिरात नोंदविला सहभाग
अंबाजोगाई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना कुंबेफळ येथील सर्व जातीधर्माच्या युवकांनी रक्तदान करून गुरुवार दिनांक 21 एप्रिलला अभिवादन केले. युवकांच्या वतीने राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे कौतुक होत आहे.
एकीकडे समाजात दुही निर्माण करण्याचे काम काहीजण करत असतात. मात्र, अंबाजोगाई तालुक्यातील कुंबेफळ गावाने सामाजिक सलोखा जपत डॉ. आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त सर्व जातीधर्माच्या युवकांनी रक्तदान करून अभिवादन केले. यात काही महिलांनी देखील रक्तदान केले आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंती उत्सव सोहळा कुंबेफळ गावात दोन दिवस साजरा होत आहे. जयंतीचे औचित्य साधून आज युवकांनी रक्तदान शिबीर आयोजित केले. शिबिरात 40 युवकांनी रक्तदान केले आहे. या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून केरबा जोगदंड तर प्रमुख उपस्थितीमध्ये गणेश भोसले, दूरदर्शनचे प्रतिनिधी रोहिदास हातागळे, सूर्यकांत कसबे, प्रा. श्रीपती वाघमारे, धम्मानंद हातागळे, गौतम हातागळे, विष्णू सोनवणे, दयानंद वाघमारे यांच्यासह आदींची उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे आयोजन सामाजिक कार्यकर्ते वसंत शिंपले, व्यंकटेश किर्दंत, रणजित जोगदंड, इब्राहिम शेख यांनी केले होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती ही ग्रामीण भागात 1 एप्रिल ते 30 एप्रिलपर्यंत साजरी केली जाते. रक्तदान शिबिरासाठी स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयातील शासकीय रक्त पेढीचे डॉ. रवी गुंडरे, शशिकांत पारखे, रमेश तोगरे, शेख बाबा, बालाजी पडगी, अजिंक्य शिंदे, तुषार घाडगे यांनी परिश्रम घेतले. ग्रामसेवक गजानन सोळंके, शिल्पा हातागळे, गणेश भोसले, भारत हुलगे, अमोल भोसले, सलीम पठाण, वसंत शिंपले, रत्नदीप सरवदे यांच्यासह आदींनी रक्तदान केले.