सामाजिक बांधिलकी : ‘स्वाराती’ परिसरातील रिक्षाचालक गरजूंसाठी दररोज देतात 100 पाण्याचे जार, हजारोंची भागते‌ तहान

रिक्षाचालकांचे होतंय कौतुक : छत्रपती शाहू महाराजांच्या चौकाचीही केली दुरुस्ती

अंबाजोगाई : ‘स्वाराती’ परिसरात प्रवेशद्वारासमोर गेल्या चार – पाच वर्षांपासून येथील रिक्षाचालक – मालक संघटना, दवाखाना पॉईंटच्या वतीने उन्हाळ्यात मोफत जारच्या पाण्याची व्यवस्था गरजूंसाठी केली जात आहे. यंदा उन्हाळ्यात गेल्या दीड महिन्यांपूर्वी सुरू करण्यात आलेल्या या पाणपोईच्या माध्यमांतून हजारों रुग्णांची आणि नातेवाईकांची तहान भागली आहे. त्यासोबतच राजश्री छत्रपती शाहू महाराजांच्या चौकाचीही दुरुस्ती रिक्षा चालकांनी स्वत : निधी जमा करून केली आहे. त्यांनी दाखविलेल्या ‌‌या सामाजिक बांधिलकीबद्दल सर्व स्तरातून त्यांचं कौतुक होत आहे.

‘स्वाराती’ रुग्णालयात दररोज हजारों रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक येत असतात. यातील बहुतांश गोरगरिब रुग्ण हे रुग्णालयात ये – जा करण्यासाठी ॲटोरिक्षाचा वापर करतात. अंबाजोगाई शहरात सध्या उन्हाची तीव्रता अधिक जाणून लागली आहे. अशात सहाजिकच प्रत्येकाला पाण्याची तहान लागल्याशिवाय रहात नाही.

रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांची आणि त्यांच्या नातेवाईकांची तहान भागवावी आणि त्यांच्या पैशांची बचत व्हावी, या उद्देशाने येथील रिक्षाचालक – मालक संघटना, दवाखाना पॉईंटच्या वतीने गेल्या चार – पाच वर्षांपासून उन्हाळ्यात अविरतपणे मोफत जारच्या पाण्याचं वाटप सुरू आहे. या पाणपोईच्या माध्यमांतून दररोज 100 ते 150 जारचे पाणी गरजूंसाठी दिले जात आहे. जारसाठी लागणारा खर्च रिक्षाचालक स्वत: आपल्या दररोजच्या कमाईतून देतात. सकाळपासून सुरू झालेलं पाण्याचं वाटप सायंकाळपर्यंत चालू असते. त्यामुळे दररोज हजारों रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक या पाणपोईचा लाभ घेतात. रिक्षाचालकांनी सामाजिक बांधिलकी जोपासत सुरू केलेल्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

छत्रपती शाहू महाराजांच्या चौकाचीही केली दुरुस्ती

‘स्वाराती’ परिसराच्या प्रवेशद्वारासमोर असलेल्या छत्रपती शाहू महाराजांच्या चौकाची अत्यंत दयनीय अवस्था झाली होती. चौकाचं बांधकाम मोडकळीस आलं होतं. चारीही बाजुंनी असणाऱ्या विटा पडलेल्या होत्या. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून रिक्षाचालकांनी स्वत: दररोजच्या कमाईतून पैसे जमा करून या चौकाची दुरुस्ती केली आहे. त्यांनी केलेल्या या कार्याबद्दल रिक्षाचालक – मालक संघटना, दवाखाना पॉईंटच्या सर्व पदाधिकारी, सदस्यांचे अभिनंदन केले जात आहे.  ‌‌‌‌‌‌‌