कर्मचाऱ्यांना होतोय त्रास : लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष
अंबाजोगाई : आशिया खंडात ग्रामीण भागात नावाजलेल्या ‘स्वाराती’ वैद्यकीय महाविद्यालयाच्या वर्ग 3 आणि 4 च्या कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांची अवस्था बकाल झाली असून याचा त्रास मात्र परिचारिका आणि कर्मचाऱ्यांना सोसावा लागत आहे. अनेकवेळा निवेदने देऊनही निवासस्थानांच्या समस्येकडे दुर्लक्ष होत आहे. निवासस्थानांची तात्काळ दुरुस्ती करावी, अशी मागणी कर्मचाऱ्यांच्या वतीने करण्यात येत आहे.
दरम्यान आज दिनांक 19 एप्रिलला सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संजय कोकणे यांनी ‘स्वाराती’ च्या दयनीय झालेल्या निवासस्थानांची पाहणी केली आणि अधिष्ठाता कार्यालयात बैठकीसही हजर राहिले.
या संदर्भात कार्यकारी अभियंता कोकणे यांच्याशी आमच्या प्रतिनिधीने बातचीत केली. कोकणे बोलताना म्हणाले की, ‘स्वाराती’ महाविद्यालयाचा परिसर खूप मोठा आहे. या ठिकाणी वर्ग 1 ते 4 च्या कर्मचाऱ्यांची जवळपास 600 पेक्षा अधिक निवासस्थानं आहेत. मी आज वर्ग 3 आणि 4 च्या निवासस्थानांची पाहणी केली. या दोन्ही ठिकाणच्या निवासस्थानांची अवस्था दयनीय आहे. वर्ग 4 चे निवासस्थानं पुर्णपणे मोडकळीस आलेली आहेत. आवश्यकतेनुसार ती पुर्णपणे जमिनदोस्त करुन नव्याने बांधण्याची गरज आहे. तसा प्रस्ताव वैद्यकीय शिक्षण विभागाची परवानगी मिळाल्यानंतर आम्ही करणार आहोत.
दुरुस्तीसाठी 20 कोटींचा खर्च
‘स्वाराती’ च्या निवासस्थानांच्या ड्रेनीज् सिस्टमचा नव्याने सर्व्ह करुन एका ठिकाणी पाण्याचा निचरा होण्यासाठी बदलावी लागणार आहे. ड्रेनीज् वर झाले आहेत आणि रस्ते खाली झाले आहेत. त्यामुळे रस्त्यावर पाणी साचत आहे. यासह सर्व निवासस्थानांची दुरुस्ती करण्यासाठी जवळपास 20 कोटींचा खर्च अपेक्षित आहे. अधिष्ठाता कार्यालयाला आम्ही तसे एकत्रित प्रस्ताव करण्यास सांगितले आहे. ते आले की आम्ही इस्टिमेट तयार करून शासनाकडे पाठविणार आहोत, असेही कोकणे यांनी सांगितले.
2016 पासून कंत्राटदारांचे बीलं थकीत
‘स्वाराती’ परिसरात कंत्राटदारांनी केलेल्या विविध कामांचे बीलं जवळपास 2016 पासून थकीत असून ते पैसे अद्यापही त्यांना मिळाले नाहीत. ‘स्वाराती’ परिसरात बांधकामासाठी वर्षाला 30 ते 35 लाख रुपये महाविद्यालयाला खर्च करता येतात. ही रक्कम अत्यंत तुटपुंजी आहे. परिसरात जवळपास 600 निवासस्थानं, रुग्णालय, वैद्यकीय महाविद्यालयं आहे. त्यामुळे बरीचशी कामं निधीअभावी रखडली जातात. ही रक्कम वाढविण्याची गरज आहे.
लोकप्रतिनिधी समस्यांची दखल घेतील का ?
‘स्वाराती’ रुग्णालयाच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी अनेकवेळा लोकप्रतिनिधी रुग्णालयात आढावा बैठक घेतात. परंतू, कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांच्या समस्येकडे दुर्लक्ष केले जाते. रुग्णालय परिसरात आज टोलेजंग इमारतींची बांधकामे चालू आहेत. परंतू, कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष झाल्याने यावर दमडीही खर्च होत नाही. या भागातील आमदार, लोकप्रतिनिधींनी या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देत निवासस्थानांची झालेली बकाल अवस्था दूर करून कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाला न्याय देत परिसराला गतवैभव प्राप्त करून द्यावेत, अशी मागणी कर्मचाऱ्यांच्या वतीने करण्यात येत आहे.