अंबाजोगाई : येथील दै. लोकमतचे प्रतिनिधी अविनाश मुडेगांवकर यांना उदगीर तालुका पत्रकार संघाच्या वतीने मराठवाडास्तरीय शोध पत्रकारिता पुरस्काराचे वितरण नुकतेच उदगीर येथे झाले. यावेळी मंत्री संजय बनसोडे, जेष्ठ पत्रकार अमर हबीब, बसवराज पाटील, माजी आमदार मनोहर पटवारी, जया मुडेगांवकर आदी उपस्थित होते.
उदगीर तालुका पत्रकार संघाच्यावतीने गेल्या बारा वर्षांपासुन मराठवाडास्तरीय उत्कृष्ठ वार्ता व शोध वार्ता या दोन गटातून पुरस्काराचे आयोजन केले जात असुन पुरस्काराचे हे तेरावे वर्ष होते. या वर्षी जाहीर झालेल्या पुरस्कारात शोध वार्ता गटात प्रथम पुरस्कार पत्रकार अविनाश मुडेगांवकर यांच्या ‘जिवावर उदार होऊन 400 रुपये रोजाने करतात काम’ या बातमीस अर्जून मुद्दा यांच्यावतीने जेष्ठ पत्रकार महादप्पा मुद्दा यांच्या स्मरणार्थचा पुरस्कार मान्यवरांच्या उपस्थितीत शाल, श्रीफळ, रोख रक्कम पाच हजार रुपये व सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप होते.
अविनाश मुडेगांवकर हे गेल्या 26 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत आहेत. आजपर्यंत त्यांना पत्रकारितेतील विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. त्यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.