शिस्तबध्द वातावरणात सायंकाळी मिरवणूक : तरुणांचा जल्लोष
अंबाजोगाई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 132 वी जयंती मोठ्या हर्षउल्हासात साजरी करण्यात आली. शहरातील विविध भागात सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या सर्व कार्यक्रमांना भीम अनुयायांनी मोठ्या उत्साहात प्रतिसाद दिला.
सायंकाळी शिस्तबध्द वातावरणात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली. यात तरुणांचा जल्लोष पहायला मिळाला. सायंकाळी पावसाने हजेरी लावली होती, तरीही मिरवणुकीत भीम अनुयायांचा जोश तोच होता.
कोरोनाचे निर्बंध शिथिल झाल्यानंतर याही वर्षी शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या दिमाखदार सोहळ्यात साजरी करण्यात आली. जयंतीनिमित्त शहरात सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

प्रबोधनात्मक कार्यक्रम, व्याख्याने, रक्तदान शिबिरे यासह विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या होत्या. जयंती उत्सवाचे सर्व कार्यक्रम, स्पर्धा यशस्वी करण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून प्रत्येक प्रभागात भीम अनुयायी मेहनत घेत होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेची शहरात सायंकाळी मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत शहरातील सर्व जयंती उत्सव समित्या सहभागी झाल्या होत्या. मिरवणुकीत प्रबोधनात्मक, सामाजिक संदेश देणारे आकर्षक देखावे सादर करण्यात आले होते. जे संपूर्ण अंबाजोगाईकरांचे लक्ष वेधून घेत होते. मिरवणुकीत ढोल – ताशांचा, डीजेचा गजर होता. छत्रपती शिवाजी महाराज चौकात भीम अनुयायांचा जनसागर लोटला होता.

भीमगीतांवर लेझिम – टिपऱ्या, मुलींचे डान्स यामुळे वातावरण आनंदीत झाले होते. भीमगीतांवर तरूणाईसोबत जेष्ठ नागरिक आणि महिलांही ठेका धरताना दिसत होत्या. सगळीकडे ‘एकच साहेब बाबासाहेब’ या घोषणांचा आवाज होता.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मिरवणुकीसाठी अंबाजोगाई तालुका प्रशासनानेही अत्यंत चांगले नियोजन केले होते. पोलिस प्रशासनानेही कुठेही अनुचित प्रकार घडू नयेत, यासाठी तगडा पोलिस बंदोबस्त ठेवला होता. भिम अनुयायांनीही अत्यंत उत्साहात आणि शांततेत मिरवणूक काढली. कोठेही अनुचित प्रकार घडला नाही. कोरोनाच्या तीन वर्षांच्या सावटानंतर याही वर्षी अंबाजोगाईत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात आणि जल्लोषात साजरी झाली. यात संपूर्ण अंबाजोगाईकर आनंदून गेले होते.