उपमुख्यमंत्री अजित पवार यांची राजकिशोर मोदी यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट

अंबाजोगाई : राज्याचे उपमुख्यमंत्री ना. अजित पवार यांनी माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी यांच्या घरी सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांच्या सोबत राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्यमंत्री ना. धनंजय मुंडे, विधान परिषद सदस्य आ. संजय दौंड, अमरसिंह पंडित, माजी आमदार पृथ्वीराज साठे, राजेंद्र जगताप यांच्यासह आदी उपस्थित होते.

माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी काँग्रेसमध्ये तब्बल 40 वर्षे कार्य करत असताना त्यांना पक्षांतर्गत गटबाजी सहन करावी लागली. या बाबींना कंटाळून व कार्यकर्त्यांच्या इच्छेखातर राजकिशोर मोदी यांनी मागच्या 6 महिन्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष ना. जयंत पाटील, उपमुख्यमंत्री ना. अजि पवार, पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई प्रदेश राष्ट्रवादी कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. यावेळी मोदी यांच्या सोबत अनेक नगरसेवक व असंख्य कार्यकर्ते यांनी देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

राजकिशोर मोदी यांनी मागील 25 वर्ष अंबाजोगाई नगरपरिषदेची सत्ता एकहाती सांभाळली आहे. नगरपरिषदेत काम करतांना सुध्दा त्यांना विरोधकांनी त्रास देण्याचा प्रयत्न केला. हीच बाब हेरून ना. अजित पवार यांनी राजकिशोर मोदी यांच्या पाठीशी ताकत उभा करण्याचे ठरविले व त्यांचा फायदा पक्ष कार्यासाठी, पक्ष वाढीसाठी करून घेण्यासाठी, मोदी यांना राजकीय बळ देण्यासाठी आज त्यांच्या ‘मोदी निवास’ या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. राजकिशोर मोदी यांच्या पाठीशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सर्व ताकदीने उभा असेल, अशी ग्वाही पवार यांनी दिली.

ना. अजित पवार ‘मोदी निवास’ येथे आले असताना अनेकांनी वेगवेगळी निवेदने त्यांना दिली. आलेल्या निवेदनावर तात्काळ कार्यवाही करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना त्यांनी दिले. यावरून त्यांच्या कार्यतत्परतेची चुणुक पाहावयास मिळाली. ना. अजित पवार व पालमंत्री धनंजय मुंडे यांचे शहरात आगमन होताच ढोल – ताशा व फटाक्यांच्या गजरात भव्य स्वागत करण्यात आले. निवासस्थानी आगमन झाल्यानंतर राजकिशोर मोदी, सुनिता मोदी व संकेत राजकिशोर मोदी यांनी त्यांचे कौटुंबीक स्वागत केले.

यावेळी प्रा. नानासाहेब गाठाळ, श्रीमती आशा सरवदे, प्रकाश सोळंकी, हकीम भाई, महादेव धांडे, बबन लोमटे, हाजी महबुब, तानाजी देशमुख, प्रवीण जायभाय, सुनिल व्यवहारे, दिनेश भराडीया, अशोक देवकर, चंद्रकांत महामुनी, सचिन जाधव, अमोल मिसाळ, अजिम जरगर, शरद काळे, प्रताप देवकर आदीजण उपस्थित होते.