दरदिवशी रस्त्यावर होतात छोटे – मोठे अपघात
टीम AM : अंबाजोगाई शहरात वाहतुकीचे तीन – तेरा वाजले असून मुख्य रस्त्यावर वाहतुकीचे नियम धाब्यावर बसल्याने रस्ता पुर्णपणे जाम होत आहे. त्यामुळे दरदिवशी वाहन चालविताना छोटे – मोठे अपघात रस्त्यावर पहावयास मिळत आहेत. शहरातील वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी प्रशासनाने पावले उचलावीत, अशी मागणी सामान्य जनतेकडून करण्यात येत आहे.
अंबाजोगाई शहरातील लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत चालली असून त्यासोबत वाहनांची संख्या देखील मोठ्या प्रमाणात वाढली आहे. दररोज शहरातील मुख्य रस्त्यावर हजारों वाहनांची वर्दळ असते. परंतू, रस्त्यावर वाहन चालवताना कोणीही वाहतुकीचे नियम पाळताना दिसत नाहीत. शहरातील मुख्य चौकांतील अवस्था तर आणखीनच वाईट आहे. मी जाऊ का ? तू जा ? अशा अवस्थेत वाहनं चालवताना अनेक ठिकाणी अपघात घडत आहेत. मुख्य चौकांत पुर्वी ट्राफीक पोलिस आढळून येत असतं. पण आता तेही दिसेनासे झाले आहेत.
शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, सावरकर चौक, यशवंतराव चव्हाण चौक आदी चौकातील अवस्था तशीच आहे. वाहतूकीला शिस्त लावण्यासाठी ट्राफीक पोलिसांनी पावलं उचलण्याची गरज निर्माण झाली आहे.
बंद असलेली सिग्नल यंत्रणा चालू करावीत
अंबाजोगाई शहरात बऱ्याच वर्षांपूर्वी सिग्नल यंत्रणा बसविण्यात आली होती. ती काही दिवस सुरळीत चालू होती. त्यामुळे वाहतुकीची शिस्त देखील वाहनधारकांना काही प्रमाणात लागली होती. परंतू, काही तांत्रिक कारणांमुळे ही यंत्रणा बंद पडली आणि दीर्घ काळ बंदच राहिली. मध्यंतरी पुन्हा नगर परिषदेच्या पुढाकाराने ही यंत्रणा चालू करण्यात आली. पण नियंत्रण कोणी ठेवावे, या कारणास्तव सिग्नल बंद करण्यात आले. आजतागायत शहरातील सिग्नल बंदच असून ते शोभेची वस्तू झाली आहेत. प्रशासनाच्या वतीने सिग्नल यंत्रणा चालू केल्यास निश्चितच वाहतूक व्यवस्था सुरळीत होण्यासाठी मदत होईल, यासाठी शहरातील सिग्नल पुर्ववत चालू करावेत, अशीही मागणी जोर धरू लागली आहे.